Advertisement

‘ते’ फक्त बोलण्यासाठीच मंत्री झालेत, नवाब मलिकांचा दानवेंना टोला

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत, राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत व कितीजण धोरणे ठरवत आहेत हे लोकांना माहीत आहे.

‘ते’ फक्त बोलण्यासाठीच मंत्री झालेत, नवाब मलिकांचा दानवेंना टोला
SHARES

महाराष्ट्र सरकारने आमच्याशी चर्चा न करताच कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेन प्रवासास मुभा देण्याची घोषणा केली आहे. अद्याप असा प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाही, असं वक्तव्य करणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टोला हाणला आहे. 

येत्या १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे आलेला नाही, अशी टिप्पणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केली. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला.

नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत, राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत व कितीजण धोरणे ठरवत आहेत हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्यांना अधिकार नाही, ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झाले आहेत, त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही.

हेही वाचा- लोकल प्रवाशांचे ‘क्यू आर कोड’ तपासायचे कुणी?, रावसाहेब दानवेंनी जबाबदारी राज्याकडे ढकलली

ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असल्याने तो प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे जाणारच आहे, असंही नवाब मलिक (nawab malik) यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल अॅप तयार केलं जात आहे. राज्य सरकार आणि रेल्वे मिळून यासाठी यंत्रणा तयार करत आहे. मुंबईतल्या ६५ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आॅफलाइन पद्धतीने क्यूआर कोड मिळणार आहे. 

लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रत्येक लोकांना प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. मात्र लसीचा दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर १५ दिवसांनी पास मिळू शकेल. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर विनाकारण हुज्जत घालू नका, असा सल्ला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा- लोकल प्रवासाच्या पासबाबत महापौरांची मोठी घोषणा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा