Advertisement

खाजगी शाळांची मनमानी थांबलीच पाहिजे - संजय निरुपम


खाजगी शाळांची मनमानी थांबलीच पाहिजे - संजय निरुपम
SHARES

मुंबईतील खाजगी शाळांनी केलेल्या भरमसाठ आणि मनमानी फी वाढीमुळे या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक अतिशय त्रस्त झाले आहेत. पालकांनी वाढीव फी भरावी यासाठी खासगी शाळांकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहेत. या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील पालकांचे एक शिष्टमंडळ शनिवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी निरुपम यांनी खासगी शाळांची मनमानी थांबविण्याची विनंती करत राज्यपालांना निवेदन दिले.

महाराष्ट्रातील फीवाढीच्या कायद्याविरोधात जाऊन खाजगी शाळा दरवर्षी अवास्तव फीवाढ करत आहेत. कायद्यानुसार खासगी शाळा प्रत्येक वर्षी फी वाढ करू शकत नाहीत. तरीही दरवर्षी 15 टक्क्यांहून अधिक फी वाढ होत आहे. मनमानी पद्धतीने फी वाढवलेल्या शाळांनी ही फी वाढ मागे घेतली पाहिजे. यासाठी राज्यपालांनी शासनावर दबाव टाकावा आणि त्यांच्याशी बोलावे. कारण सत्ताधाऱ्यांनी पालकांना होणाऱ्या त्रासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असे निरुपम यावेळी म्हणाले.

या प्रश्नावर येत्या दोन दिवसांत सर्व अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे निरुपम यांनी सांगितले.

यावेळी निरुपम यांच्या सोबत दहिसर येथील युनिव्हर्सल हाय स्कूलच्या पालकांच्या शिष्टमंडळातून साक्षी डहाणूकर, सुमन शेट्टी, गुरुनाथ पाटकर, निरव शाह, रुपाली शानभाग, प्रशांत जोशी, नेहा पटेल, पूजा परमार, स्नेहल पटेल व इतर पालक उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा