Advertisement

‘एक देश, एक निवडणूक’ला काँग्रेसचा विरोध; तर मिलिंद देवरांचा पाठिंबा

'एक देश एक निवडणुकी'ला काँग्रेसचा विरोध असल्यानं काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार घातला होता. असं असूनही, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मोदी सरकारच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ला काँग्रेसचा विरोध; तर मिलिंद देवरांचा पाठिंबा
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश, एक निवडणुकी’ वर चर्चा करण्यासाठी देशातील सर्व पक्षांची मतं जाणून घेण्यासाठी बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील बहुतांश पक्षांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, 'एक देश एक निवडणुकी'ला काँग्रेसचा विरोध असल्यानं काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार घातला होता. असं असूनही, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मोदी सरकारच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. देवरा यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत त्यांचं मत मांडलं आहे. या पोस्टमधून त्यांनी काँग्रेसचे बहिष्कार घालणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या मुद्दांकडं लक्ष नाही

'१९६७ पर्यंत आपल्या देशात अशाच प्रकारे निवडणूक होत होती. ही गोष्ट आपण विसरुन चालणार नाही. मी माजी खासदार आहे व ४ वेळा निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की सतत देशात निवडणुका सुरू राहणं हे कामात  अडथळा निर्माण करतं. सततच्या निवडणुकांमुळं नेते महत्वाच्या मुद्दांकडं लक्ष देऊ शकत नाही आणि हा देशासमोरील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे' असं मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलं.

बहिष्कार दुर्दैवी

'एक देश एक निवडणूक’ या बैठकीवर टाकलेला बहिष्कार हा दुर्दैवी आहे. भारतातील काही राजकीय पक्ष ज्याचा मी स्वत: देखील हिस्सा आहे ते आता चर्चा, संवाद आणि एकत्र मिळून काम करणं याचं महत्त्व विसरत चालले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. तसंच, भारताच्या लोकशाहीसाठी धोक्याचं देखील आहे', असंही मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, सीपीआयचे सीताराम येचुरी आणि सुधाकर रेड्डी, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यासह रामविलास पासवान आणि फारुक अब्दुल्ला यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.



हेही वाचा -

चर्चगेटमधील बॅंक ऑफ इंडिया इमारतीत आग

विधानभवनातील कँटिनच्या जेवणातील मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा