'योजना फक्त नावालाच'


  • 'योजना फक्त नावालाच'
SHARE

दादर - पालिका रुग्णालयात ज्या आरोग्य सुविधा दिल्या जातात त्यामध्ये बेसिक सुविधा देण्यामध्ये ही रुग्णालये कमी पडतात अशी कबुली खुद्द शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी मुंबई 'लाइव्ह'च्या मुंबई नाका या कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमात आरोग्य या विषयावर चर्चा झाली. यावेळी भाजपाच्या नगरसेविका वीणा जैन, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद औताडे आणि आरोग्य अभ्यासक सचिन पवळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी भाजपाच्या नगरसेविका वीणा जैन यांनी पालिकेच्या रुग्णालय व्यवस्थेवर बोट ठेवले. पालिकेची रुग्णालये ही असून नसल्यासारखी आहेत असं सांगत या रुग्णालयात नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तर आरोग्य तज्ज्ञ सचिन पवळे यांनी आरोग्य जीवनदायी योजना असो वा इतर आरोग्याच्या योजना असोत, त्या फक्त नावापुरत्याच आहेत. या योजनांद्वारे उपचार घ्यायचे असले तरी पैसे द्यावे लागतात असं सांगत या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.

जसा पालिकेच्या शाळांवर लोकांचा विश्वास नाही तसाच विश्वास लोकांचा पालिकेच्या रुग्णालयांवर देखील नसल्याचे शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी मान्य केले. मात्र पालिका रुग्णालये लोकांना चांगल्या सुविधी देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 2012 पासून आजतागायत 11 लाख 85 हजार नागरिकांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेतल्याचे मिलिंद औताडे यांनी सांगितले. तसेच येत्या एप्रिलमध्ये अजून नव्या योजना येतील आणि त्यामध्ये इतर आजारांचा देखील समावेश असेल असं त्यांनी मुंबई नाक्यावर बोलताना सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या