Advertisement

शिवसैनिकांना, उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ निर्णयाची अपेक्षा


शिवसैनिकांना, उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ निर्णयाची अपेक्षा
SHARES

शिवसेनेचा 'दसरा मेळावा' शिवाजीपार्क मैदानात होत आहे. शिवसेनेच्या प्रथा आणि परंपरेनुसार हा मेळावा होत असला तरी सध्याची राजकीय स्थिती पाहता 'निर्णया'पर्यंत पोहोचलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडेच शिवसैनिकांचे लक्ष आहे.


निर्णयाच्या समीप

शिवसेनेचा ५२ वा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर होत असून यामध्ये सीमोल्लंघन करण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत. काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागवार आमदारांशी चर्चा करून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतरच शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी आम्ही 'निर्णया'च्या समीप आल्याचे जाहीर केले होते.


बॅटरी चार्ज की डाऊन?

शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळाव्याबाबत यंदा उत्सुकता शिगेला आहे. सत्तेत सहभागी असूनही शिवसेना भाजपला सतत लक्ष्य करीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी महागाई विरोधात संपूर्ण शिवसेनेने मुंबईत मोठे आंदोलने पेटवले. या आंदोलनामुळे शिवसैनिकांच्या अंगात ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे चार्ज झालेल्या या शिवसैनिकांनी, आता बस्स झाले, साहेबांनी सत्तेतून बाहेर पडावेच, असा सूर आळवायला सुरुवात केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांना अपेक्षित असा निर्णय न घेतल्यास चार्ज झालेल्या शिवसैनिकांची बॅटरी डाऊन होण्याची शक्यता आहे, असे खुद्द शिवसैनिकांचेच म्हणणे आहे.


कात्रित सापडले पक्षप्रमुख

भाजपप्रणित सत्तेत उद्धव ठाकरे यांचे मन रमत नाही! सत्तेत असूनही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत. एका बाजूला पक्षफुटीची भीती, तर दुसऱ्या बाजूला स्वपक्षीय आमदारांचीच आपल्याच मंत्र्यांविरोधात असलेली नाराजी अशा कात्रित सध्या उद्धव ठाकरे अडकले आहेत. त्यामुळेच सत्तेतून बाहेर पडण्याचे धमकी वजा इशारे एव्हाना हवेतच विरलेत.

शिवसेनेच्या भूमिकांना आता त्यांचे राजकीय विरोधकही फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यातच काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपाच्या राज्य मंत्रिमंडळातील वर्णी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणे हे स्वाभाविक आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना काही ठोस निर्णयांची अपेक्षा असेल. त्यामुळे खरेच शिवसेना निर्णयाच्या जवळ आली आहे का ? की अपेक्षेप्रमाणे हा सुद्धा फुसका बारच ठरणार ? हे आता या दसरा मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा