Advertisement

‘माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले’, संजय राऊतांचा मोठा दावा

मी शिवसेनेपासून दूर जाणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलोय”, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत कडाडले.

‘माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले’, संजय राऊतांचा मोठा दावा
SHARES

शिवसेना नेते संजय राऊत जामीनावर बाहेर येताच आक्रमक झाले आहेत. “आता त्यांना कळेल की मला अटक करुन किती मोठी चूक केली. देशाची राजकारणातील सर्वात मोठी चूक असेल की संजय राऊतांना अटक केली. आज न्यायालयाने सांगितलं की, संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. संजय राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. हे न्यायालयाने सांगितल्यावर ते हायकोर्टात पळत गेले. पण पळू द्या. मला किती वेळाही अटक करा. मी शिवसेनेपासून दूर जाणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलोय”, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत कडाडले.

संजय राऊत त्यांच्या भांडूप येथील घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

काय म्हणाले संजय राऊत? 

मी नक्कीच घरी आलोय ना? मला वाटलं शिवतीर्थावर आलोय, दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की, शंभर दिवसांनंतरही तुम्ही माझं स्मरण ठेवलं. माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालाय.

बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे आज महाराष्ट्र आणि देशाने पाहिलं. याच रस्त्यावरुन मला अटक करुन घेऊन गेले होते. तेव्हाही तुम्ही जमला होता. तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गेल्या तीन महिन्यात तोडण्याचा, फोडण्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण ती तुटलेली नाही.

हे अभद्य शिवसेना आहे. ही बुलंद शिवसेना आहे. ते अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलंय. मशाल फडकलेली आहे आणि एकच शिवसेना महाराष्ट्रात राहील ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना.

आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो सरकार आएँगी हमारी! हे मला माहिती होतं.

आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा