Advertisement

भाजपविरोधी आघाडीसाठी पवारांची खेळी, होणार सर्वपक्षीय बैठक

शरद पवार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यापासून भाजपविरोधातील तिसऱ्या आघाडीच्या शक्यतांना बळ मिळू लागलं आहे.

भाजपविरोधी आघाडीसाठी पवारांची खेळी, होणार सर्वपक्षीय बैठक
SHARES

भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणून नवे डावपेच खेळण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी आखली आहे. पवारांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध राजकीय पक्षांच्या बैठकीचं आयोजन मंगवार २२ जून २०२१ रोजी करण्यात आलं आहे. या बैठकीतच तिसऱ्या आघाडीला दिशा मिळू शकते, असा अंदाज लावला जात आहे.

शरद पवार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यापासून भाजपविरोधातील तिसऱ्या आघाडीच्या शक्यतांना बळ मिळू लागलं आहे. २०२४ निवडणुकीआधी भाजप विरोधकांना एकत्र आणून एक ठोस अजेंडा किंवा कार्यक्रम ठरवण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रमंचच्या माध्यमातून मंगळवारी सायंकाळी ४ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. एकमेकांसमोर बसून संवाद साधता यावा म्हणून कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा- “हे सरकार ५ वर्षे काय २५ वर्षे टिकेल”

याबाबत अधिक माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व निमंत्रीत सहभागी होतील. तसंच शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध राजकीय पक्षांच्या बैठकीचं आयोजनही उद्या करण्यात आलं आहे. या बैठकीत आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, इ राजकीय पक्षांचे नेते सहभागी होतील.

या बैठकीत आगामी लोकसभा अधिवेशनाबाबत तसंच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील विरोधक पक्षांची एकजूट करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होईल. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार आहेत, अशी माहिती देखील नवाब मलिक यांनी दिली आहे.

(ncp chief sharad pawar arrange a meeting with opposition party leaders against bjp)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा