Advertisement

आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय; शरद पवारही आश्चर्यचकीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रालय परिसराचा फेरफटका मारला. यावेळी तुंबलेलं पाणी पाहून आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी साचलेलं पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय; शरद पवारही आश्चर्यचकीत
SHARES

वादळी वारा आणि मुसळधार पावसाने मुंबईला मागील ३ दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढलं आहे. कुठे झाडं उन्मळून पडली, तर कुठे पाणी तुंबलं. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रालय परिसराचा फेरफटका मारला. यावेळी तुंबलेलं पाणी पाहून आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी साचलेलं पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. (ncp chief sharad pawar reaction on mumbai rains)

मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून टाकली. कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर बुधवारी मुंबईत दिवसभरात ३२८.२८ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय बुधवारी शहरात ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे देखील वाहत होते. परिणामी सखल भागात ठिकठिकाणी पाणी तुंबलं, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील १०० हून अधिक झाडे उन्मळून पडली. रस्त्यावरील गुडघ्याभर पाण्यात वाहने अडकून पडली, तर ट्रॅकवरही पाणी साचल्याने लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरफच्या जवानांची मदत घ्यावी लागली.

हेही वाचा - Mumbai Rains : गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड


या मुसळधार पावसातही बुधवारी सायंकाळी मंत्रालयासमोरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या बैठकीला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर घरी जात असताना सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्ह करून मंत्रालय परिसरात साचलेलं पाणी दाखवलं. मुंबईत अविश्वसनीय पाऊस पडलाय. मंत्रालयासमोर समुद्रच निर्माण झाल्यासारखं वाटतं असं सुप्रिया सुळे यांनी म्हणताच. मी देखील आयुष्यात पहिल्यांदाच इतकं पाणी साचलेलं पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.  

दरम्यान, रात्री पेडर रोडवर देखील लँडस्लाईड झालं आहे. मुंबईकर साखर झोपेत असताना प्रसिद्ध असलेला पेडर रोड मुसळधार पावसानं खचला आहे. रस्त्यावर झाडं उन्मळून पडली असून मातीचा ढीगही रस्त्यावर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडं आणि मातीचा ढीग हटवण्यात अडथळे येत आहे. मुंबईतील पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला तडे गेल्याचंही पाहायला मिळालं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement