अजित पवारांच्या राजीनामानाट्यावर अखेर पडदा, ‘हे’ गुपित आलं बाहेर…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देत शुक्रवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा टाकला. पत्रकारांशी बोलताना ते काही वेळ भावूकही झाले होते.

SHARE

शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुठलाही संबंध नसताना केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांचं नाव या प्रकरणात गोवण्यात आलं. यामुळे कमालिचा अस्वस्थ होऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देत शुक्रवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा टाकला. पत्रकारांशी बोलताना ते काही वेळ भावूकही झाले होते.

शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातील वातावरण तापलं होतं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदवत होते. राष्ट्रवादीचे सगळे नेतेही शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जमलेले असताना नेमके अजित पवारच तिथे उपस्थित नव्हते. त्यानंतर अजित पवार यांनी थेट राजीनामा दिल्याची बातमी बाहेर आल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान शनिवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या मागचं सविस्तर कारण सांगण्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यानुसार दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांचं नाव आल्याने मी व्यथित झालो. मागील काही वर्षांपासून मी या प्रकरणात सातत्याने चौकशीला सामोरा जातोय. पण शरद पवार या बँकेचे संचालकच काय पण साधे सदस्यही नसताना त्यांना केवळ बदनाम करण्यासाठी या प्रकरणात गोवण्यात आलं. या वयात त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने मला वाईट वाटलं. त्यामुळे कुणालाही पूर्वकल्पना न देता मी राजीनामा दिल्याचं अजित पवार म्हणाले.

ठेवीच १२ हजार कोटींच्या

बँक घोटाळा प्रकरणावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की, या बँकेवर केवळ राष्ट्रवादीचेच नाही, तर भाजप, शिवसेना, शेतकरी कामगार पक्षाचे संचालक देखील आहे. एवढंच नाही, तर अनेक आयएएस आॅफिसरही या बँकेवर संचालक होते. अशा स्थितीत केवळ अजित पवार या संचालकांपैकी एक असल्याने त्यांचे नातेवाईक म्हणून शरद पवार यांचं नाव या प्रकरणात गुंतवण्यात आलं. मी जर या बँकेच्या संचालकपदी नसतो, तर हे प्रकरण उभंच राहिलं नसतं. या बँकेच्या ठेवीच जर साडेअकरा ते १२ हजार कोटी रुपयांच्या असताना या बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा होणारच कसा असा प्रतिसवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

चौकशी कधी पूर्ण होणार?

काही लोकं किंवा प्रसार माध्यमं सत्यपरिस्थिती समजून न घेता तोंडात येईल ते आकडे बोलत आहेत. यामुळे माझीच नाही, तर शरद पवार यांची नाहक बदनामी होत आहे. याआधीच ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मी चौकशीला सामोरे जातोय. त्यात माझ्यावर आणखी २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला. हे प्रकरण २०१० सालचं आहे, मग ते बरोबर निवडणुकीच्या बरोबर आधी २०१९ सालीच कसं काय बाहेर आलं? या प्रकरणी सुरू असलेली चौकशी नेमकी संपणार तरी कधी? असा प्रश्न विचारत अजित पवार भावूक झाले. 

सरकारने दिलं नियमबाह्य कर्ज

अडचणीत आलेले शेतकरी, संस्था यांना कर्ज देताना काही वेळेत आऊट आॅफ द वे जाऊन मदत करावी लागते. त्यावर चौकशीत अनियमितता असं नमूद करण्यात आलेलं आहे. भ्रष्टाचाराचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. जे पैसे बँकेतून देण्यात आले, ते थेट घेणाऱ्याच्या खात्यात पोहोचले आहेत. अशाचप्रकारे सध्याच्या सरकारने देखील ४ सहकारी संस्थांना ते तोट्यात असताना नियमबाह्य पद्धतीने कर्जे दिली आहेत. मग त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी अजित पवार यांनी केली.

गृहकलह नाही

गृहकलहाबाबत बोलताना शेवटी ते म्हणाले की, आमच्या कुटुंबात कुठलाही गृहकलह नाही. माझे आणि पवार यांचे, सुप्रिया, रोहीत, पार्थ असे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत. आजही आम्ही घरातील वडीलधाऱ्यांचा शब्द ऐकतो. त्यामुळे चुकीचा अर्थ कुणीही काढू नये. तसंच राजकारणाची पातळी घसरल्याने राजकारण करण्याऐवजी उद्योगधंदा शेतीकडे लक्ष देण्याचा सल्ला पार्थला दिल्याचंही ते म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या