तब्बल २० तासांनंतर अजित पवार अवतरले, राजीनामा देण्यामागचं कारण सांगणार?


SHARE

शुक्रवारी सायंकाळी आमदारकीचा राजीनामा देऊन नाॅट रिचेबल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी दुपारी साधारण २० तासांनंतर अवतरले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. मात्र या भेटीनंतर बाहेर आलेल्या अजित पवार यांनी आपल्या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही.

शुक्रवार संध्याकाळपासून कुणाच्याही संपर्कात नसलेल्या अजित पवार यांनी शनिवारी सकाळी शरद पवार यांना फोन करून भेटीची इच्छा व्यक्त केली. शरद पवार पुण्याहून मुंबईला परतल्यावर अजित पवार राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत सिल्व्हर ओक इथं गेले. त्यावेळी पवार यांच्या निवासस्थानी शरद यांच्यासोबत सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आणि पार्थ पवार उपस्थित होते. यानंतर मुंडे निवासस्थानाच्या बाहेर पडल्यावर राष्ट्रवादीचा एकही नेता तिथं उपस्थित नव्हता.

दरम्यान, पवार कुटुंबात साधारणत: २ तास चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तर शरद पवार यांनी चिंतेचं कुठलंही कारण नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता सर्वांना अजित पवार पत्रकार परिषदेत काय सांगणार याकडं लक्ष लागलं आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या