दोन दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - अजित पवार

  Mumbai
  दोन दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - अजित पवार
  मुंबई  -  

  नरिमन पॉइंट - सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिले आहे. तसेच उत्तरप्रदेशमध्ये 36 हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने येत्या 2 दिवसांत शेकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असा अल्टिमेटम अजित पवार यांनी सरकारला दिला आहे. संघर्ष यात्रेनिमित्त बुधवारी एमसीए येथे विरोधी पक्षांच्या वतीने वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

  आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या चार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. या राज्यांपेक्षा आपल्या राज्याची परिस्थिती खूप चांगली आहे. आज सत्ताधारी पक्षाचा एक आमदार उठून कर्जमाफी देऊ नका असे सांगतो. ही असंवेदनशीलता आहे. मुख्यमंत्री कर्जमाफीवर सकारात्मक असल्याचे बोलतात. सरकार सकारात्मकतेतून बाहेर पडून कधी मदत करणार? काही आमदारांचे निलंबन करायचे आणि काहींना मागे घ्यायचं हा सरकारचा रडीचा डाव आहे

  - अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

  राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून बुलढाणा, धुळे, नंदुरबार, पालघर, नाशिक अशा चार जिल्ह्यांत संघर्षयात्रा पोहोचेल. एकूण चार टप्प्यांमध्ये संघर्ष यात्रा काढण्याची विरोधी पक्षांची रणनीती आहे.

  या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार पंतगराव कदम, शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.