Advertisement

भुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरेंची भेट


भुजबळ समर्थकांनी घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी सध्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेत भुजबळ समर्थकांना दिलासा दिला.

संपूर्ण मुंबईभर 'भुजबळ जोडो' आंदोलन सुरू असून भुजबळ समर्थक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्याच मोहिमेचा भाग म्हणून भुजबळ समर्थक राज ठाकरे यांना भेटले. 


कुणाकुणाचा समावेश?

यावेळी भुजबळ समर्थक माजी खासदार देवीदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार शिरीष कोनवाळ, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे, जि.प.अध्यक्ष मायावती पगारे, पंढरीनाथ थारे, प्रकाश वडके, दिगंबर गिते, सुनिल मोरे, राधाकिसन सोनावणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तर मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हे देखील उपस्थित होते.


काय म्हणाले राज?

या सर्व नेत्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज यांनी ''भुजबळांच्या अटकेबाबत राजकारण सुरु आहे. परंतु हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे त्यावर कुणालाही भाष्य करता येणार नाही. ही केस आर्थिक विषयांवरची आहे. त्यामुळे या प्रकरणात जामीन कधीच मिळायला हवा होता. कारण याआधीच त्यांच्या सर्व संशयास्पद मालमत्ता गोठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विषय केवळ चौकशीचाच उरतो.'' असं म्हणत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

एवढंच नव्हे, तर तुमच्या अभियानाचं नाव 'भुजबळ जोडो' या ऐवजी 'भुजबळ छोडो' असं असायला हवं होतं, या शब्दांत मार्मिक टिप्पणीही केली.

भुजबळांबाबत सुरु असलेलं सुडाचं राजकारण योग्य नाही. हे सर्वपक्षीय अभियान आहे. त्यात कुठलंही राजकारण नाही. भुजबळांच्या सुटकेसाठी आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याचं यावेळी आमदार जयंत जाधव यांनी सांगितलं.



हेही वाचा-

छगन भुजबळांना आता सिडकोकडूनही दणका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा