Advertisement

पेट्रोल-डिझेलचे दर ‘असे’ करा कमी, रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये इंधनावरील कर कोण कमी करणार यावर टोलवाटोलवी सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर ‘असे’ करा कमी, रोहित पवारांचा केंद्राला सल्ला
SHARES

देशात मागील काही आठवड्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचा खिसा चांगलाच कापला गेलाय. एका बाजूला इंधनाचे दर कमी करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत असताना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये इंधनावरील कर कोण कमी करणार यावर टोलवाटोलवी सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

इंधन दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे; मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल, ही अपेक्षा!, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

पेट्रोलचे दर आता १०० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. अशीच दरवाढ कायम राहिली तर हे भाव शंभरीही ओलांडतील. या दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाला आहे.  

हेही वाचा- पेट्रोल, डिझेलचे दर का वाढत आहेत? जाणून घ्या भाववाढीचं गौडबंगाल

पेट्रोल आणि डिझेल या दैनंदिन वापराच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. त्यामुळे ही दरवाढ सर्वांना सोसावी लागत आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. ही आयात प्रामुख्याने आखाती देशांकडून केली जाते.  केंद्र सरकार २०१५ पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीचा बोजा स्वत: सहन करून देशातील तेल उत्पादक कंपन्यांना आॅईल बॉण्ड विकून भरपाई करीत असे. आता मात्र कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारानुसार पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीच्या किमतीत बदल करण्याचं स्वातंत्र्य तेल कंपन्यांना सरकारने दिलं आहे. परिणामी आता इंधनांचे दर रोज वाढत आहेत.

मुंबईत एक लिटर पेट्रोलची आधारभूत किंमत ३९ रुपये आहे. म्हणजे तेल विपणन कंपन्या ३९ रुपये दराने पेट्रोल डीलर्सला विकतात. यानंतर, केंद्र सरकार प्रत्येक लिटर पेट्रोलवर ३२ रुपये ९८ पैसे एक्साईज ड्युटी लावते. त्यामुळे एका झटक्यात पेट्रोलची किंमत ७२ रुपयांवर जाते. याशिवाय प्रत्येक पेट्रोल पंप विक्रेत्याला प्रति लिटर ३ रुपये ६९ पैसे कमिशन मिळतं. यानंतर जिथं पेट्रोल विकलं जातं, तिथं राज्य सरकारकडून २० रुपये विक्री कर आकारला जातो. त्यानंतर अखेरीस महाग पेट्रोल ग्राहकांना मिळतं.

(ncp mla rohit pawar suggestion to decrease fuel price)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा