अहो सुप्रियाताई, नियम फक्त सामान्यांसाठीच का?

Mumbai  -  

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराची धामधूम पाहायला मिळत आहे. या प्रचारादरम्यान नेहमीच वेगवेगळे किस्से पाहायला मिळतात. गुरुवारी मुंबईत सुद्धा असाच एक किस्सा घडलाय. हा किस्सा आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा. या प्रकाराची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू असलेली पाहायला मिळतेय. मालाड येथील अप्पापाडामध्ये वॉर्ड 42 च्या उमेदवार धनश्री भरडकर यांच्या प्रचाराला सुप्रिया सुळे आल्या होत्या. तिथली प्रचार सभा संपवून ठाण्यात प्रचारसभेला जाताना सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या. मात्र ट्रॅफिक सुटण्याची वाट न पहाता त्या थेट एका कार्यकर्त्याच्या बाईकवरूनच ठाण्याला निघाल्या. या वेळी त्या ज्या बाईकने प्रवास करत होत्या त्या बाईक स्वाराने हेल्मेट न घातल्यामुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र सामान्य मुंबईकरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका लोकप्रतिनिधीने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे सुप्रिया सुळे खासदार असून असे वागू शकतात तर सर्वसामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न लोकांनी उपस्थित केलाय.

Loading Comments