सरसकट कर्जमाफी शिवाय पर्याय नाही - अशोक चव्हाण

  Mumbai
  सरसकट कर्जमाफी शिवाय पर्याय नाही - अशोक चव्हाण
  मुंबई  -  

  तत्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतकऱ्यांना न फसवता राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि कृषी पूरक कर्ज सरसकट माफ करावे, ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. यासंबंधातली आपली भूमिका काँग्रेस पक्ष लवकरच सरकारला लेखी कळवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी टिळक भवन दादर येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सरकारने घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अटी आणि शर्ती घालून अनेक शेतकऱ्यांना वगळण्याचा घाट सरकारने घातला आहे. कर्जमाफीसाठी जमीनीच्या क्षेत्राची किंवा कर्जाच्या रकमेची मर्यादा सरकारने घालू नये. मराठवाडा आणि विदर्भात बहुसंख्य शेतकऱ्यांचे क्षेत्र हे पाच एकरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जमीन क्षेत्राची मर्यादा घातली तर बहुसंख्य शेतकरी वगळले जातील.


  हेही वाचा -

  शेतकरी कर्जमाफीवरून श्रेयवादाचा अंक सुरू

  ३१ ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री


  अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, त्यांना तात्काळ नवीन कर्ज मिळेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र यासंदर्भात सरकारने शासन निर्णय काढला नाही, बँकांना लेखी आदेश दिले नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन नवीन कर्जाबाबत विचारणा केली. मात्र बँकेने आम्हाला सरकारकडून लेखी आदेश नाहीत, असे सांगितले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ सर्व शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देऊन तात्काळ नवीन कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत. पेरणीसाठी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्या संबंधीचा शासन निर्णय अद्याप काढला नाही. सरकारने सरसकट 10 हजार रूपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिएकर मदत द्यावी, असेही चव्हाण म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.