Advertisement

‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आरोप-प्रत्यारोपांचा जो काही खेळ सुरू आहे. त्याकडे पाहून शिवरायांवर प्रेम करणाऱ्या, त्यांना आदर्श मानणाऱ्या सर्वसामान्य शिवप्रेमींचं मन नक्कीच दुखावलं असेल.

‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख
SHARES

गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आरोप-प्रत्यारोपांचा जो काही खेळ सुरू आहे. त्याकडे पाहून शिवरायांवर प्रेम करणाऱ्या, त्यांना आदर्श मानणाऱ्या सर्वसामान्य शिवप्रेमींचं मन नक्कीच दुखावलं असेल. या प्रकरणावर सातत्याने आक्रमक वक्तव्य करून पाॅलिटीकल मायलेज मिळवण्याचा कुणी कुणी प्रयत्न केला, त्यावर एक नजर टाकूया.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून सुरू असलेला वाद शमतो न शमतो तोच भाजप नेते आणि तथाकथित लेखक जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वादाची ठिणगी पडली. या पुस्तकाचं रितसर प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील एका कार्यक्रमात झाल्याने केंद्रातील विरोधकांच्या हाती आयतं कोलीत लागलं. या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करण्यात आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य करण्यात आलं. 

१ - शिवाजी महाराज आणि पंतप्रधान मोदींची तुलना मनाला पटतच नाही. भाजपने या पुस्तकाच्या माध्यमातून महाराजांचा आणि महाराष्ट्राच्या मातीचा अपमान केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

तर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकामागोमाग एक ३ ट्विट करत आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगात कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. महाराष्ट्र भाजपने यावर भूमिका स्पष्ट करावी. 

२ - आज के शिवाजी नरेंद्र मोदी… असं महान पुस्तक लिहून भाजप कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण? हेच ते जयभगवान गोयल ज्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. या कृत्यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. 

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केलेली तुलना भाजपात शिरलेल्या शिवरायांच्या वंशजांना मान्य आहे का? सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला..!

असं ट्विट करत संजय राऊत यांनी शिवरायांच्या वंशजांनाच याप्रकरणी भूमिका घेण्यास उकसवलं. राऊतांचं ट्विट शिवरायांच्या वारसदारांना चांगलंच बोचल्याने त्यांनी तात्काळ यावर प्रतिक्रिया दिली. पण प्रतिक्रिया देताना त्यांनी राऊत यांनाही लक्ष्य केलं. 

३- कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी सर्वात पहिल्यांदा संजय राऊत यांच्या ट्विटला प्रतिउत्तर दिलं. त्याआधी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत. त्यांची शिवाजी महाराजांसोबत केलेली तुलना माझ्यासहीत सर्वच शिवभक्तांना आवडलेली नाही. त्यामुळे ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे, त्या अध्यक्षांनी तात्काळ ते पुस्तक मागे घ्याव, अन्यथा वेगळे परिणाम होतील. या शब्दांत पक्षनेतृत्वावर आपली नाराजी व्यक्त केली.

त्याचबराेबर दुसरं एक ट्विट करून संजय राऊत यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली. उद्धवजी त्या संजय राऊताच्या जीभेला लगाम घाला, प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. सिंदखेड राजा इथं जिजाऊ जयंती कार्यक्रमात मी काय बोललो होतो, त्याची आधी त्याने माहिती घ्यायला पाहिजे होती, असं म्हणत राऊतांची खरडपट्टी काढली.

४- दुसरीकडे शिवेंद्रराजे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांना समज दिली. पक्षातील अतिउत्साही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवर घाला, अशी पक्षनेतृत्वाला विनंती करतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे अनुभवी नेते आहेत. शिवाय ते पत्रकार देखील आहेत. त्यामुळे त्यांनी भाषा जपून वापरावी. टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण योग्य भाषेतून आरोप-प्रत्यारोप केले जावेत. खासदार आहेत म्हणून काहीही बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, असं शिवेंद्रराजे म्हणाले.

या नंतर मात्र संजय राऊत काहीसे नरमले. छत्रपतींच्या प्रत्येक गादींविषयी आम्हाला आदर आहे. शिवरायांची कुणाशीही तुलना केलेली महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. ज्यांचा छत्रपतींच्या कुटुंबाशी संबंध आहे, त्यांना नाराज होण्याचं कारण नाही. किंबहुना त्यांनी याविषयी परखड भूमिका घ्यावी, ही जनतेची भावना आहे, असा खुलासा केला. 

५- दरम्यान हे वादग्रस्त पुस्तक लिहिणारे लेखक जयभगवान गोयल यांनी या पुस्तकावरून गदारोळ उडाल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केलं. अनेकजण राम आणि कृष्ण या देवांसोबत काहींची तुलना करतात. मी देखील त्याचप्रकारे मोदींची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. भारतात दहशतवाद्यांकडून संसदेवर, मुंबईत हल्ले झाले. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. उलट मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून चोख प्रत्युत्तर दिलं. मोदी सरकारच्या काळात देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सक्षम वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसं काम करत होते, तसंच काम नरेंद्र मोदी करत आहेत. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे, त्यामुळेच त्यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत केल्याचं गोयल म्हणाले. सोबतच पक्षाने आदेश दिल्यास आपण हे पुस्तक मागे घेऊ किंवा नव्याने लिहू असं गोयल यांनी स्पष्ट केलं.

गोयल यांच्या स्पष्टीकरणानंतर भाजपने मात्र त्यांच्यापासून हात झटकले. या पुस्तकाशी आणि पुस्तकाच्या लेखकाशी कुठलाही संबंध नसल्याचं भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. शिवाय लेखकाने हे पुस्तक मागे घेतल्याचीही माहिती दिली.

६- एका बाजूला भाजप-शिवसेनेचं युद्ध सुरू असताना दुसऱ्या बाजूला भाजने राष्ट्रवादीवरही या मुद्द्यावरून पलटवार केला. या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी लावली जाते. पण हीच उपाधी शरद पवार यांनाही लावण्यात येते. शरद पवारांच्या कार्यकाळात तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा त्यांना ही उपाधी लागू होते का? या शब्दांत मुनगंटीवारांनी राष्ट्रवादीला टोला हाणला.

७- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला जाणता राजा म्हणा असं मी कुणालाही म्हणालेलो नाही, असं म्हणत या आरोपांवर खुलासा केला. तर जाता जाता ही उपाधी रामदास स्वामींनी छत्रपतींना दिली होती. पण रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नव्हते, असं म्हणत नव्या वादालाही तोंड फोडलं.

८- या गदारोळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाबरोबरही तुलना होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांत कुठलीही चूक नाही. त्यांना माहीत देखील नसणार की त्यांच्यावर असं पुस्तक कुणी लिहिलं असेल म्हणून. या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी असं पुस्तक लिहून मूर्खपणा केला आहे. त्यांना पक्षाच्या प्रमुखांनी समज देण्याची गरज आहे. सध्या ते दिल्लीत आहेत, पण कधीतरी मुंबईत येतीलच, असं म्हणत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना इशारा दिला.  

९- या आरोप-प्रत्यारोपांना धार चढली, ती उदयनराजेंनी दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर  शिवसेना स्थापन करण्याआधी तुम्ही शिवरायांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? गरज नसेल, तर शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करून दाखवा, असं खुलं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलं. शिवाजी महाराजांचा इतकाच आदर असेल, तर शिवसेनेने दादरमधील पक्षाचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनवर शिवाजी महाराजांच्या वर बाळासाहेबांचा फोटो का लावला? वडापावला महाजारांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं? तेव्हा आदर कुठं जातो? भिवंडीतील दंगल कुणाच्या आदेशावरून घडवून आणली जाते? असे प्रश्न उपस्थित करून कुणी काहीही बोलायचं आणि आम्ही ऐकूण घ्यायचं हे यापुढं चालणार नाही, अशा शब्दांत उदयनराजेंनी शिवसेनेला तंबी दिली.

१०- त्यावर गप्प राहतील, ते संजय राऊत कसले, त्यांनी पुन्हा एकदा उदयनराजेंवर तोंडसुख घेत शिवरायांचे वारसदार असल्याचे पुरावे आहेत का? असा सवाल त्यांना केला.

११- तसंच मुनगंटीवारांचा टोला जितेंद्र आव्हाडांनी अलगद झेलला. होय शरद पवार जाणता राजा आहेत, असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओच सोशल मीडियावर टाकला. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव, अद्वितीय नेता म्हणजेच शरद पवार. इथला पाणीप्रश्न, शेतीचा प्रश्न, राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, नागरी वस्तीतले प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, प्रश्नाची मालिका सांगा प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडे आहेत. म्हणून त्यांना ‘जाणता राजा’ म्हणतात.

शिवाय कुणाच्या घरात एखाद्याने आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं, तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जात असल्याचं म्हणत आव्हाडांनी मुनगंटीवार आणि उदयनराजेंना चोख प्रत्युत्तर दिलं.

१२- राऊत आणि आव्हाडांच्या उत्तरांनी जळफळाट झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने दोघेही दिसतील, तिथे ठोकून काढू असा इशाराच देऊन टाकला. पाठोपाठ शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महाराजांच्या वंशजांबद्दल अवमानकारक शब्द काढणारे, संजय राऊत यांची पदावरून हाकालपट्टी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली. शिवाय सातारा आणि सांगलीत कडकडीत बंदही पाळला. 

सध्या तरी हा मुद्दा थंड झाला असून एकाख्या नेत्याने त्यावर प्रतिक्रिया दिल्यास हा मुद्दा पुन्ह उचल खाण्यास वेळ लागणार नाही. परंतु या सर्व गदारोळाने शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या नेत्यांची उंची आणखी ठेंगणी केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा