Advertisement

पक्षांचे बॅनर फाडले, मोर्चात राजकारण्यांना 'नो एन्ट्री'


पक्षांचे बॅनर फाडले, मोर्चात राजकारण्यांना 'नो एन्ट्री'
SHARES

मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चाला राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला असला, तरी तोंडी पाठिंबा देण्यापेक्षा विधीमंडळात मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर करा, असे म्हणत मोर्चेकऱ्यांनी हा पाठिंबा धुडकावून लावला आहे. एवढेच नव्हे, तर मोर्चादरम्यान विविध राजकीय पक्षांनी लावलेले झेंडे आणि बॅनर्सही मोर्चेकऱ्यांनी फाडून टाकले. तसेच भाजपा आमदार आशिष शेलार यांना धक्काबुक्कीही झाल्याचे म्हटले जात आहे.

भायखळा येथील रस्त्यावर भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जनता दल युनायटेड या पक्षांचे लावलेले झेंडे, बॅनर उतरवत मोर्चेकऱ्यांनी ते फाडून टाकले. मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देणारा शिवसेनेचा जीजामाता उद्यानासमोरील बॅनर मोर्चेकऱ्यांनी उतरवतानाच शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरला मात्र हात लावला नाही.

मोर्चात सामील व्हायचे असेल, तर राजकारणी म्हणून नव्हे, तर सामान्य मोर्चेकरी म्हणून सामील व्हा, असे मोर्चाच्या आयोजकांचे स्पष्ट म्हणणे आहे. हे सूत्र अवलंबताना मोर्चेकऱ्यांकडून राजकारण्यांच्या मोर्चातील शिरकावाला प्रतिबंध केला जात आहे.


'विधानसभेत जाऊन तुमचे काम करा'

आझाद मैदानातील मोर्चात सामील होण्यास आलेले भाजपाचे आमदार आशिष शेलार यांना मोर्चेकऱ्यांकडून धक्काबुक्की झाल्याचे म्हटले जात आहे. मोर्चात यायचे असेल, तर काही ठोस भूमिका घेऊन या, नाहीतर विधानसभेत जाऊन तुमचे काम करा, मराठा आरक्षाची भूमिका मांडा, असे मोर्चेकऱ्यांनी शेलार यांना सुनावले. मोर्चेकऱ्यांचा संताप पाहून शेलार यांनी तेथून काढता पाय घेतला. परंतु शेलार यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे.



राजकारणाची झूल बाजूला ठेवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप, तर आ. नितेश राणे, निलेश राणे मोर्चात सहभागी झाले आहेत. खा. संभाजीराजे छत्रपतीही सुरूवातीपासूनच मोर्चात सामील झाले आहेत.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा