Advertisement

Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी मी अयोध्येला जाणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार
SHARES

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून निमंत्रितांची यादीही तयार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा भूमिपूजन कार्यक्रमाबाबत वक्तव्य करत वादात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तरी मी अयोध्येला जाणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. (not interested to go ayodhya for ram mandir bhumi pujan programme says ncp chief sharad pawar)

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मुहूर्ताचा शोध सुरू असताना देखील शरद पवार यांनी त्यावर भाष्य करत वादाला फोडणी घातली होती. जेव्हा अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, त्याच दिवशी कोरोना जाईल, असं मोदी सरकारला वाटत आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत देखील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला जातोय. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु आमच्यासाठी तर कोरोना संकटाशी मुकाबला करणंच महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी राम मंदिराच्या प्रस्तावित भूमिपूजन कार्यक्रमावर भाष्य केलं होतं.

हेही वाचा - "राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!

त्यानंतर भाजप नेत्यांकडून शरद पवार यांना लक्ष्य करण्यात आलं. शरद पवार हे नेहमी हिंदुत्वाच्या विरोधातच का बोलतात, शरद पवारांचं वक्तव्य हा पंतप्रधानांचा नव्हे, तर रामाचा अपमान असल्याची टीका करण्यात आाली होती. एवढंच नाही, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत भूमिपूजनाला जाण्याआधी शरद पवारांची परवानगी घेतील का? असे प्रश्नही विचारण्यात आले. त्यावर आम्हाला निमंत्रणाची गरज नाही. मुख्यमंत्री अयोध्येला जाणारच असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुन्हा एकदा राम मंदिर भूमिपूजनावर आपली भूमिका स्पष्ट केली.  ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर राम मंदिराबाबत आता कोणताही वाद उरलेला नाही. परंतु व्यक्तीगत पातळीवर जर मला भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही. कारण देशात सध्या कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थिती माझ्या दृष्टीने मला राज्यातच राहणं महत्त्वाचं वाटत आहे.

येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी २०० निमंत्रितांनाच बोलवण्यात येणार आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement