Advertisement

निवासस्थानानंतर महापौरांचे कार्यालयही हलणार


निवासस्थानानंतर महापौरांचे कार्यालयही हलणार
SHARES

महापौर निवासस्थान केल्यानंतर राणीबागेऐवजी मलबारहिलमध्येच मोठ्या निवासस्थानाची मागणी करणाऱ्या महापौरांना आता मोठे दालनही आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुरुवारी यासाठी जुन्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाची जागेचीही पाहणी केली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या डोक्यावरच दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त कार्यालयाची मागणी महापौरांनी केली असून परंपरागत असेल्या महापौरांचे कार्यालय कुठेही हलवण्याचे प्रशासनाचा विचार नसताना अचानकपणे महापौरांनी केलेल्या मागणीमुळे प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली आहे.

शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनमध्ये गुरुवारी पार पडली. परंतु ही बैठक आटोपून महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर हे थेट महापालिका मुख्यालयात नव्याने देण्यात येणाऱ्या पक्ष कार्यालयांच्या जागेची पाहणी केली. परंतु पक्ष कार्यालयाच्या जागेची पाहणी केल्यानंतर महापौरांनी थेट दुसरा मजला गाठला आणि विधी विभागाचे कार्यालय तसेच विकास नियोजन आराखड्याच्या कार्यालयाची पाहणी केली. या दोन्ही जागांची पाहणी करून ही जागा महापौर कार्यालयासाठी योग्य असल्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. महापौरांच्या या अचानक केलेल्या मागणीमुळे उपस्थित असलेल्या महापालिकेचे अधिकारी आणि शिवसेनेचे नेते यांनाही धक्का बसला. त्यानंतर महापौरांनी पहिल्या मजल्यावरील विरोधी पक्षनेते आणि स्थापत्य (शहर) समिती अध्यक्ष यांच्या दालनाचीही एकत्रपणे पाहणी केली. परंतु दुसऱ्या मजल्यावरील जागाच त्यांनी कार्यालयासाठी निवडली असून महापालिका आयुक्तही त्याच मजल्यावर असल्यामुळे महापौरांनी आयुक्तांचे सख्खे शेजारी होण्याचे ठरवले आहे. दरम्यान, प्रशासनाने मात्र, महापौरांचे महापालिका सभागृहाशेजारी दालनाचे नुतनीकरण किंवा ते हलवण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

महापौरांचे निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्यात आल्यानंतर त्यांचे निवासस्थान राणीबागेत अतिरिक्त आयुक्त यांच्या जागेत हलवण्यात येणार आहे. परंतु या जागेवरील निवासस्थान घेण्यास महापौरांनी नकार कळवल्यामुळे त्यांनी मलबालहिलमधील दोन अतिरिक्त आयुक्तांचे एकत्र करून निवासस्थान बनवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बंगल्यापाठोपाठ महापौरांनी कार्यालयही बदलून मोठ्या जागेची मागणी केल्यामुळे कोणत्या गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे महापौरांनी हा निर्णय घेतला याचीची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ढापणार शिवसेना

महापालिका मुख्यालयातील तळ मजल्यावर शिवसेना आणि भाजपासाठी समान क्षेत्रफळाची दोन कार्यालये तयार केली आहेत. त्यातील ऑफीस वन हे कार्यालय शिवसेनेसाठी आहे. शिवसेनेचे 84 नगरसेवक असून त्यांनी आणखी पाच अपक्षांनी साथ दिल्यामुळे त्यांचे संख्याबळ 89 एवढे झाले आहे, तर भाजपाची संख्या अभासे आणि अपक्षाला धरून 84 एवढे झाले आहे. परंतु सध्या देण्यात येणारे कार्यालय पुरेसे नसल्यामुळे सध्या आरोग्य समिती अध्यक्ष बसत असलेल्या संपूर्ण कार्यालयाला जोडून शिवसेनेचे पक्ष कार्यालय तयार केले जावे, अशी मागणी महापौर आणि सभागृहनेत्यांनी केली आहे. आरोग्य समिती अध्यक्षांच्या दालनातील अर्धा भाग शिवसेना पक्ष कार्यालयाला जोडून उर्वरीत भागात राष्ट्रवादी काँग्रेससाठी कार्यालय तयार करण्याचा प्रशासनाचा विचार होता. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयच शिवसेना ढापणार असल्यामुळे प्रशासनाला त्यांच्यासाठी नव्या कार्यालयाचा शोध घ्यावा लागणार आहे.

मनसे आणि सपानेही नाकारले कार्यालय

तळ मजल्यावरील काँग्रेस पक्ष कार्यालयासमोरील जागेत दोन कार्यालये बनवण्यात आली आहे. ही दोन्ही कार्यालये मनसे आणि समाजवादी पक्षाला देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. परंतु कार्यालयांची ही जागा अपुरी असल्यामुळे मनसेचे गटनेते दिलीप लांडे आणि सपाचे गटनेते रईस शेख यांनी ही कार्यालये स्वीकारण्यास स्पष्ट नकार कळवला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा