पेंग्विनच्या मृत्यूचे पडसाद स्थायी समितीत

  Pali Hill
  पेंग्विनच्या मृत्यूचे पडसाद स्थायी समितीत
  मुंबई  -  

  मुंबई - राणीच्या बागेतील पेंग्विन मादीच्या मृत्यू झाल्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटलेत. विरोधकांनी याप्रकरणास शिवसेनेला जबाबदार धरल्यानं शिवसेना आणि विरोधक असा जोरदार सामना रंगला आहे. प्रशासनानं या वेळी आतंरराष्ट्रीय नियमानुसार पेग्विंनची देखभाल केली जात असल्याचं स्पष्ट केलंय. विरोधकांना मात्र हे उत्तर न पटल्यानं त्यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचा निषेध करत सभात्याग केला.

  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील वातावरण तापू लागलं आहे. विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानामधील सार्वजनिक सुविधांच्या बांधकामाचा प्रस्ताव बुधवारी समितीच्या बैठकीत चर्चेसाठी आला होता. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी याप्रस्तावाला हरकत घेत पेंग्विनच्या मृत्यूस शिवसेनेला जबाबदार धरलं. भारतीय वातावरणात पेंग्विन जगू शकत नसताना त्याचा अभ्यास न करता त्यांना इथं ठेवण्यात आलंय. त्यांच्या संरक्षणाच्या कामासाठी काळ्या यादीतील कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. हट्टापाई पेंग्विन येथे आणण्यात आल्याचे आरोप विरोधकांनी केले.

  शिवसेनेनं हे सर्व आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पेंग्विनच्या प्रस्तावाला पूर्वी विरोध न करणारे आता विरोध करत आहेत, असे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी स्पष्ट केलंय. सर्वसामान्याप्रमाणांना परदेशी पेंग्विनचे मुंबईत दर्शन घडावे, हे महापालिकेचा उद्देश असल्याचा खुलासा विश्वासराव यांनी केला. तर 'आंतरराष्ट्रीय निकषांनुसार पेंग्विनला डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली होती', यासाठी २४ तास तीन डॉक्टर येथे कार्यरत असतात' असे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सांगितले.

  पेग्विंनच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मनसेवर शिवसेनेनं कुरघोडी केली. शिवसेनेचे सदस्य प्रमोद सावंत यांनी एका बड्या नेत्याच्या घरातील कुत्राचं उदाहरण देवून मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता चिमटा काढला. यावर मनसेच्या सदस्यांचा संताप अनावर होऊन त्यांनी सभात्याग केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.