Advertisement

विरोधक म्हणतात 'भुजबळांना खासगी रुग्णालयात न्या'


विरोधक म्हणतात 'भुजबळांना खासगी रुग्णालयात न्या'
SHARES

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात मिळणाऱ्या कथित वागणुकीचा मुद्दा सोमवारी विधान परिषदेत चर्चेला आला. यावेळी विरोधकांनी भुजबळांवर खासगी रुग्णालयातच उपचार व्हावेत, ही मागणी लावून धरली.


'याचा विचार करू'

भुजबळ आरोपी म्हणून नव्हे तर आमदार असल्याने त्यांचा विशेषाधिकार डावलता येणार नाही. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केली. यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी कायद्याच्या चौकटीत बसून काही करता येईल का, याचा विचार करू, असं आश्वस्त केले तर सदस्यांचा भावनांचा विचार व्हावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.

कपिल पाटलांची मागणी

छगन भुजबळ यांच्यावर जे. जे. रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याचा मुद्दा सदस्य कपिल पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित करत भुजबळ यांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र तरीही त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवले जात आहे. त्यांची प्रकृती आता कशी आहे, त्यांच्यावर योग्य उपचार होत आहेत की नाही, याबाबत सभागृहाला अवगत करण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली.


धनंजय मुंडेंचा आरोप

भुजबळ हे आमदार असतानाही त्यांना ओपीडीच्या रांगेत सर्वसामान्यांप्रमाणे उभे राहावे लागते. त्यांना अनेक आजार आहेत. जे. जे. रुग्णालयात उपचार करताना त्यांना मर्यादा येत आहेत. अशावेळी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याचा विशेषाधिकार मिळत नाही. एकप्रकारे प्रशासनच त्यांना शिक्षा देत आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

जयंत जाधव भावविवश झाले

काही प्रकरणांमध्ये कैद्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिलेली आहे, हे सदस्य जयंत पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. भुजबळांच्या परिस्थितीचे वर्णन करताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव भावविवश झाले.
ते म्हणाले, गेली दोन वर्षे भुजबळ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. सभागृहाचा सदस्य असतानाही त्यांना मानवतेला शोभणार नाही, अशी वागणूक मिळत आहे. डी. एस. कुलकर्णी यांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळते, मग भुजबळांना का नाही. त्यांच्या नैसर्गिक न्यायासाठी प्रयत्न करावा. यावर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्याशी बोलून कायद्याच्या चौकटीत बसून करता येईल ते करू, असे आश्वासन दिले.

जयंत पाटलांची मागणी

भुजबळांच्या बाबतीत अटी ठेवून काम करणारे सभागृह नाही, अशी पुस्तीही पाटील यांनी जोडली. या चर्चेवर निर्देश देताना सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे अंडरट्रायल  कैद्याने आरोग्याची तक्रार केली की त्याला तुरुंग अधिकारी आणि न्यायालय यांच्या परवानगीने खासगी रुग्णालयात नेऊ शकतो. या प्रकरणात तुरुंग अधिकारी आणि न्यायालय यांची परवागनी घेऊन तसे करता येईल का, याचा विचार करावा. भुजबळांना रांगेत उभे रहावे वगैरे लागणार नाही, यादृष्टीने मदत करावी, असं मत त्यांनी मांडले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा