Advertisement

अंगणवाडी घोटाळ्यात पंकजा मुंडे, दानवेंचा सहभाग - आप


अंगणवाडी घोटाळ्यात पंकजा मुंडे, दानवेंचा सहभाग - आप
SHARES

भाजपाच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोघांचा अंगणवाडी घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केला आहे. याप्रकरणी पंकजा मुंडे यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली. मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

बालविकास सेवेअंतर्गत (आयसीडीएस) देण्यात येणारी सर्व कामे ग्रामीण समुदाय, स्वयंसहाय्य गट आणि महिला गटाकडून करण्यात यावीत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना या आदेशाला हरताळ फासत पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांनी खाजगी ठेकेदारांना ही कामे दिली, असा आरोप प्रीती शर्मा- मेनन यांनी केला.

व्यंकटेश्वर महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था लिमिटेड, महालक्षमी महिला गृहउद्योग अॅण्ड बाल विकास बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था आणि महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था लिमिटेड या तीन संस्थांवर फसवणुकीचे आरोप असतानाही या संस्थांना कामे देण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने ठपका ठेवलेल्या या तीन कंपन्याबरोबर दुसऱ्या नावाने करार करून त्यांना कंत्राट देण्यात आले. यामध्ये साडेपाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. यांत सतीश मुंडे, अशोक जैन, चारुदत्त पालवे हे एकमेकांचे व्यावसायिक भागीदार असून पंकजा मुंडे देखील त्यापैकी एक भागीदार असल्याचे मेनन म्हणाल्या.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी वर नमूद केलेल्या तीन कंपन्याच्या विरोधात 2012 मध्ये एसीबीकडे तक्रार केली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षाचे सरकार आल्यावर याच तीन कंपन्याबरोबर व्यवहार कसा करण्यात आला? यामुळे 375 महिला बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा रोजगार हिरावून घेण्यात आला आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवणार असून लवकरच आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा