Advertisement

पीएमएवायच्या 33,513 घरांच्या प्रकल्प निविदेला स्थगिती


पीएमएवायच्या 33,513 घरांच्या प्रकल्प निविदेला स्थगिती
SHARES

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढण्यात आलेल्या 33,513 घरांच्या प्रकल्पाच्या निविदेला गृहनिर्माण विभागाने स्थगिती दिली आहे. ज्या जमिनीवर हे प्रकल्प उभारले जात आहेत, त्या जमिनी अद्याप म्हाडाच्या नावावर झाल्या नसल्याच्या कारणांसह अन्य तांत्रिक त्रुटी दाखवत गृहनिर्माण विभागाने या निविदेला स्थगिती दिल्याची माहिती म्हाडाच्या कोकण मंडळातील विश्वसनीय सुत्राने दिली आहे. या स्थगितीमुळे एवढा मोठा प्रकल्प रखडला आहेच, पण या स्थगितीमुळे म्हाडा अधिकाऱ्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. ठाणे, खालापुर आणि कल्याण येथील 11 ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने 24 ऑक्टोबरला निविदा काढल्या होत्या. या योजनेंतर्गत केवळ 10 लाखांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध होणार आहेत. कोकण मंडळाकडून काढण्यात आलेल्या या निविदेमुळे मुंबईच्या आसपास पीएमएवायद्वारे परवडणारी घरे मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार होती. दरम्यान गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या पत्रानुसारच ही स्थगिती आणण्यात आल्याची जोरदार चर्चा म्हाडात आहे. तर तांत्रिक अडचणी पुढे करत भाजप पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर दरम्यान निविदा काढत श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. याविषयी कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा