Advertisement

पाॅवरहीन 'पोरखेळ'

कसलेल्या मुरब्बी राजकारण्यांच्या धामधुमीत लहानग्यांचं आवाज तरी कोणाला ऐकू जाणार? म्हणून त्यांनीही चक्क सारीपाटावरच फतकल मारुन बालहट्ट सुरु केलाय. या बालहट्टापुढे पाॅवरबाजांची पाॅवरही फुसकी ठरु लागल्याचं मागील काही दिवसांमध्ये अवघ्या महाराष्ट्राने बघीतलं.

पाॅवरहीन 'पोरखेळ'
SHARES

सत्तेच्या सारीपाटावर कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो अन् कुणी कुणाचा तहहयात शत्रूही नसतो, किमान असं म्हटलं तरी जातं. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून जो काही खेळ सुरू आहे, खासकरुन राजकारणातील पाॅवरबाजांच्या घराण्यात; त्याकडे पाहता हा पोरखेळ नाही तर दुसरं काय? असं म्हटल्यावाचून राहावलं जात नाही. पाॅवरबाजांनी हवा ओळखून माघार घेतली की पोरखेळापुढं नमून याविषयी आता राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी १० मार्चला पत्रकार परिषद घेऊन १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार देशभरात एकूण ७ टप्प्यांत (११ एप्रिल ते १९ मे २०१९), तर महाराष्ट्रात ११ ते २९ मार्च अशा ४ टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. ही घोषणा हवेत विरते न विरते, तोच देशभरातील मातब्बर उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट संचारली. तर दुसऱ्या बाजूला इच्छुक तरूण उमेदवारांचं रक्तही सळसळायला लागलं.


राज्यात भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा प्रमुख पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असला, तरी अजून कुणाच्या कोट्यातून कुठल्या उमेदवाराला तिकीट मिळणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. त्यामुळेच इच्छुक उमेदवार देव पाण्यात ठेवून कामाला लागलेत. आपापल्या हायकमांडकडून तिकीटाचा प्रसाद मिळवण्यासाठी कुठे डावपेच आखले जातायत, कुठे मनधरणी केली जातेय, तर कुठे दबावतंत्राचाही बेमालुमपणे वापर सुरू झालाय.

अशा कसलेल्या मुरब्बी राजकारण्यांच्या धामधुमीत लहानग्यांचं आवाज तरी कोणाला ऐकू जाणार? म्हणून त्यांनीही चक्क सारीपाटावरच फतकल मारुन बालहट्ट सुरु केलाय. या बालहट्टापुढे पाॅवरबाजांची पाॅवरही फुसकी ठरु लागल्याचं मागील काही दिवसांमध्ये अवघ्या महाराष्ट्राने बघीतलं.


राजकारणातले चाणक्य अशी शरद पवारांची ओळख. कुठली हवा कधी कोणत्या दिशेने वाहणार आहे हे पवारांना केवळ अंदाज बांधूनच कळतं. याबाबत देशपातळीवरच्या राजकारणातले धुरिणही त्यांना आदर्श मानतात. असं असूनही पवारांना आपल्याच घरात उडणारा राजकीय महत्त्वाकांक्षेचा धुरळा दिसू शकला नाही. एवढंच नाही, तर वयोमानानुसार राज्यातल्या राजकारणावरील पकड ढिली झालेल्या पवारांना हा धुरळा खाली बसवण्यातही अपयश आलं.

तसं नसतं तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, असं म्हणणारे पवार निवडणूक लढवण्यास तयार झाले नसते किंवा ऐनवेळी आपल्या नातवाच्या हट्टापुढे माढा मतदारसंघातून जाहीररित्या माघार घेण्यासही तयार झाले नसते.


राष्ट्रवादीवर पकड मजबूत करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न म्हणून पार्थच्या उमेदवारीकडे पाहिलं जातंय. अजितदादांनी पक्षासाठी मोठं योगदान दिल्याने त्यांच्या पाठीमागे निष्ठावंतांची फौज आहे. त्या जोरावर पार्थ सहज निवडणून येतील असं त्यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. तर मी आणि सुप्रिया लोकसभेसाठी उभं राहत असताना एकाच घरातून तिसरा उमेदवार कशाला? तसं झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असं म्हणत शरद पवार पार्थच्या उमेदवारीला विरोध करत होते.

खरं म्हणजे मावळमध्ये पार्थ जिंकून आल्यास ते सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने दिल्लीत जाऊन बसतील आणि हेच पवारांना नको असल्याचं राजकीय विश्लेषकांचा वाटतंय. काहीही असलं तरी या पोरखेळापुढे पवारांचं काहीही चालू शकलं नाही, असंच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन म्हणावं लागेल.


पोरखेळाचा दुसरा अंक घडला तो मुंबईत डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला घराणेशाहीचा हस्तीदंती मनोरा असलेल्या काँग्रेसमध्ये तिकीट मिळू नये, यापेक्षा दुसरं आश्चर्य ते कुठलं.

अहमदनगरमधील डिझर्व्हिंग कॅंडिडेट असलेले डाॅ. सुजय पाटील गेल्या ३ वर्षांपासून पक्षश्रेष्ठींच्या पायऱ्या झिजवत होते. नगरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात येत असल्याने राधाकृष्ण विखे पाटील ही जागा मिळवण्यासाठी सर्व जोर पणाला लावत होते. मात्र राष्ट्रवादीकडून आॅफर देणं तर सोडाच पवारांनी त्यांची डाळ स्वत:च्या पक्षातही शिजू दिली नाही.


तिकीट मिळू न शकल्याने शेवटच्या क्षणी त्यांना कमळ हाती घ्यावं लागलं. सुजय यांना तिकीट न मिळण्यामागे पवारांची चाणक्यनिती असल्याच्या शक्यता बाहेर येऊ लागताच नातवाचा हट्ट पूर्ण करणाऱ्या हतबल पवारांच्या मनातील द्वेषाचा अंगार अजूनही धगधगत असल्याचंच पुढं आलं. 

आपल्या मुलाचा हट्ट ज्याचा त्यानं पुरवावा, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू? असं म्हणतं पवार अणि विखे-पाटील घराण्यात आतल्या आत धुमसत असलेल्या निखाऱ्यावरील राखही बाजूला सारली. तेव्हा कुठे राजकीय धुरिणांना या नाराजीचा अर्थ उलगडू लागला. पवारांना राजकारणातून संपवायला निघालेले काँग्रेसचे दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यासोबतचं वैर २८ वर्षांनंतरही शमू शकलेलं नाही हेच यातून दिसून आलं. राजकीय शत्रूचा काटा पवार किती अलगदरित्या काढतात याचीही यानिमित्ताने प्रचिती आली. हा प्रकार राधाकृष्ण विखे पाटलांच्याही अंगलट येऊ लागलाय. त्यांना विरोधीपक्षनेतेपद सोडावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.

भाजपाला हरवायचं असेल, तर देशपातळीवर विविध प्रादेशिक राजकीय पक्षांनी एकमेकांशी जुळवून घ्यावं, महाआघाडीत सामील व्हावं, त्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे, अशा शब्दांत समविचारी पक्षांना आवाहन करणाऱ्या पवारांना स्वत: राज्यात सहयोगी पक्षाशी जुळवून घेता आलं नाही. राष्ट्रवादीचा मागचा ट्रॅक रेकाॅर्ड बघता काँग्रेससाठी नगरची जागा सोडली असती त्यातून त्यांच्या पक्षाचं फार काही बिघडलंही नसतं. परंतु तसं न केल्याने निवडणुकीच्या तोंडावरच आघाडीतली धुसफूस वाढीस लागली आहे.  


तर, दुसऱ्या बाजूला शिवसेनेतून आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवतील या अफवेचा बाजारही ऊत धरू लागलाय. उद्धव ठाकरेंनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा बाजार उधळून लावल्यानंतर आता गजानन किर्तीकरांचे पूत्र अमोल किर्तीकरही निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील असं म्हटलं जात आहे. या बातमीतलं तथ्यही यादीनिहाय समोर येईल.

जाता जाता. सुजय यांच्या भाजपा प्रवेशाला उद्देशून ''महाराष्ट्रात पोरं पळवणारी टोळी सक्रीय झाल्या''चा टोमणा जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला लगावला होता. त्यावर बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन आम्ही पोरं काय आता नातवं देखील पळवू अशी प्रतिक्रिया दिलीय. यावरून महाराष्ट्रात सुरू झालेला हा पोरखेळ इतक्याच थांबेल असं मानायची जराही आवश्यकता नाही.



हेही वाचा -

नाराजांच्या नगरीत

दुसऱ्यांना धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नाही; उद्धव यांचा शरद पवारांना टोला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा