नाराजांच्या नगरीत

पहिली आघाडी, दुसरी आघाडी..... आणि चौथी आघाडी होऊ घातली आहे. निवडणुका म्हटल्या की रूसवे फुगवे आलेच. जागांवर दाखवण्यात येणारा हक्क, मान सन्मान अशा अनेक गोष्टी अचानक डोकं वर काढू लागतात. निवडणुकांच्या कालावधीत असंतुष्टांची तर मांदीयाळीच असते असं म्हणावं लागेल.

SHARE

पहिली आघाडी, दुसरी आघाडी..... आणि चौथी आघाडी होऊ घातली आहे. निवडणुका म्हटल्या की रूसवे फुगवे आलेच. जागांवर दाखवण्यात येणारा हक्क, मान सन्मान अशा अनेक गोष्टी अचानक डोकं वर काढू लागतात. निवडणुकांच्या कालावधीत असंतुष्टांची तर मांदीयाळीच असते असं म्हणावं लागेल. राजू शेट्टी आणि महादेव जानकर यापैकीच एक. नुकतंच महादेव जानकर यांनी चौथी आघाडी काढण्याचे संकेत दिले. पण त्यांच्या या संकेताला किंवा इशाऱ्याला कोणी किती किंमत दिली किंवा देईल, हे पहावं लागेल. 

काही दिवसांपूर्वीच खुद्द दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्र्यांना जागांचा तिढा सोडवण्याचे आदेश दिले आणि आपल्या सवयीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही ते यशस्वी 'करून दाखवलं'. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी मुंबईतून जागावाटप जाहीर केलं. शिवसेना २३ जागांवर तर भाजप २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली. मात्र, भाजपाच्या मित्रपक्षांसाठी कोण किती जागा सोडणार याचा मात्र निर्णय अधांतरीच ठेवला. एकेकाळी मोदी लाटेत जवळ आलेल्या मित्रपक्षांची आता स्थिती ना घर का ना घाट का अशी झालीय. जागा देण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्यानं घटक पक्षांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय.

या नाराजांपैकीच एक जानकर. जानकरांनी चौथ्या आघाडीचा इशारा दिला आणि सदाभाऊ खोतदेखील आपल्यासोबत असल्याचं सांगितलं. परंतु सदाभाऊंचं नाव आल्यावर त्यांनीही गुगली टाकत आपण चौथ्या आघाडीत सामील होणार नाही आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या जानकरांपुढं आता काय करायचा हा यक्षप्रश्न असेल.

सदाभाऊ हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु जागा वाटपानंतर हातकणंगलेची जागा शिवसेनेच्या पारड्यात पडली आणि सदाभाऊंचीदेखील कोंडी वाढली. परंतु रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाल्याचं सांगत मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य आहे, असं सांगत सदाभाऊंनीही याबाबत अधिक भाष्य टाळलंच. एकेकाळी दो हंसो का जोडा असलेल्या सदाभाऊ आणि राजू शेट्टींमध्ये आज अचानक इतकं वैर आलंय की दोघांनाही एकमेकांचे चेहरे बघायचीही इच्छा नाही. त्यातच दोघं एकमेकांविरोधातही लढायला तयार आहेत.

मोदींच्या नावाचा जप करणाऱ्या राजू शेट्टी यांनाही आज भाजप नकोसं वाटायला लागलंय. ना युती जवळ जाऊ शकतो ना आघाडीच्या, अशी त्यांची स्थिती सध्या झाल्याचं पहायला मिळतंय. स्वाभिमानीला ३ जागा द्या अन्यथा १५ जागांवर उमेदवार उभे करुन स्वबळावर आगामी लोकसभा निवडणूक लढवू , असा अल्टीमेटमच शेट्टी यांनी आघाडीला देऊन टाकला. १३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम त्यांनी दिला असला तरी त्यांना मात्र अद्याप कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही. 

महादेव जानकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. समोर सुप्रिया सुळेंसारखा तगडा उमेदवार असतानाही जानकरांना मिळालेली मतं सर्वांना तोंडात बोटं घालायला लावण्यासारखी होती. मात्र, त्यावेळी जानकर यांचं धनगर आरक्षणाचं कार्ड कामी आलं होतं. परंतु धनगर आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न जानकर आणि भाजपाची डोकेदुखी ठरणार हे नक्की. यावेळी मित्रपक्ष म्हणून जानकरांना तिकीट द्यायचं याबाबत भाजपामध्येही दुमत आहे. याचीच कुणकुण लागलेल्या जानकरांनी नुकतीच पुण्यात राजू शेट्टींची भेट घेतली होती.

जानकर, शेट्टी यांच्याबाबत निर्णय न झाल्यास दोघं एकत्र येऊन दुसरा निर्णय घेऊ शकतात, अशा शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. हातकंणगले, कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, वर्धा, औरंगाबाद, लातूर, परभणी, शिर्डी, नाशिक, माढा, धुळे, नंदूरबार, शिरुर या ठिकाणी स्वाभिमानी आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. सध्या निवडणूक आयोगानं स्वाभिमानी पक्षाला बॅट हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे जानकरांच्या मदतीनं त्यांची ही बॅट चालणार का हे पहावं लागणार आहे.
हेही वाचा - 

शिवसैनिकांना खूश करण्यासाठी महामंडळांच्या पदांचं आमिष?

दुसऱ्यांना धुणीभांडी करण्यासाठी वापरून घेत नाही; उद्धव यांचा शरद पवारांना टोला
संबंधित विषय
ताज्या बातम्या