स्मार्ट सिटीचा प्रस्ताव अखेर फेटाळला

 Pali Hill
स्मार्ट सिटीचा प्रस्ताव अखेर फेटाळला

मुंबई - मुंबईला स्मार्ट सिटी योजनेच्या यादीतून वगळल्यानंतरही मुंबईत स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी मुंबई महानगर पालिका पुढे सरसावली आहे. स्युमोटो दाखल करत पालिकेने मुंबईत ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचवेळी या योजनेसाठी केंद्राकडून एकही पैसा मिळणार नसून पालिकेला स्वत:च्याच पैशातून ही योजना राबवावी लागणार आहे. त्यामुळे भाजप वगळता मनसे, सपा, काँग्रेस आणि शिवसेना या सर्वच पक्षांनी यासंबंधीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. स्मार्ट सिटी नावाला आक्षेप घेत मनसेने श्रेय लाटण्यासाठी असे नाव दिले जात आहे का असा सवाल करत या नावाला जोरदार विरोध केला आहे. हा विरोध लक्षात घेता हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तुर्तास तरी मुंबईला स्मार्ट सिटीत आणण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. लोअर परळ येथे स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव पालिकेने आणला आहे. स्मार्ट सिटी योजना मुंबईत पालिका आपल्याच निधीतून राबवत असताना त्यासाठी केंद्राच्या योजनेचे नाव का असा सवाल मनसे गटनेते संदिप देशपांडे यांनी विचारला आणि त्यानंतर यावरून स्थायी समितीत चांगलाच गोंधळ सुरू झाला. मनसेपोठोपाठ काँग्रेस, सपा आणि शिवसेनेनेही या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. भाजपने मात्र याबाबत सावध भूमिका घेतली. नावाला विरोध करत एखाद्या योजनेला विरोध करणे योग्य नसल्याची भूमिका यावेळी भाजपने घेतली. मात्र या प्रस्तावाला स्थायी समितीत जोरदार विरोध झाल्याने अखेर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

Loading Comments