Advertisement

गिफ्ट कल्चर संपणार का?


गिफ्ट कल्चर संपणार का?
SHARES

दिवाळसण म्हटला की प्रत्येकाच्या मनात दिव्यांच्या रोषणाईपासून फटाक्यांच्या आतषबाजीपर्यंत आणि लाडू, चिवडा, चकलीसारख्या फराळापासून कपडे, वस्तू आदी खरेदीपर्यंतच्या चर्चांना उधाण येते. यंदा मात्र, या दिवाळसणातून 'सण' वजा केल्यास उरलेल्या 'दिवाळं' शब्दापुरता मर्यादित राहतो की काय, अशी स्थिती आहे. कारण, गिफ्टवाटप कमी झाले आहे. कॉर्पोरेट असो, राजकीय असो किंवा इतर गिफ्टवाटपावर म्हणे महागाईने संक्रात आणली आहे.

आता ही स्थिती कोणामुळे आहे? तर, लगेचच उत्तर तयार आहे. ते म्हणजे सत्ताधाऱ्यांमुळे, नेत्यांमुळे! सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण दोषारोप नेहमी राजकारण्यांवरच होणे अगदी स्वाभाविक आहे.

मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच एक विधान केले आहे, त्याला फार महत्त्व आहे. त्यांचे विधान आहे की, '90 टक्के आयएएस अधिकारी कामच करीत नाहीत आणि त्यामुळेच विकास सचिवालयात अडकला आहे.' (हे वाक्य मोदींच्या समर्थनार्थ नाहीये बरं...)

माजी आयआरएस राहिलेल्या केजरीवालांनी या वाक्यातून दिल्लीपुरता आरोप केला असला, तरी खरेतर तो देशभरासाठी लागू आहे. मुंबईतल्या मंत्रालयात कामासाठी जाणाऱ्यांना तर हा अनुभव कायमचाच आहे. मंत्रालय असो किंवा कोणतेही सरकारी कार्यालय, एका दिवसांत तुमचे काम झाले आहे, असा अनुभव आहे का तुमचा?

मग केजरीवालांच्या दिल्लीत जे चाललंय, तेच सर्वत्र सुरू आहे असे म्हटले तर वावगे काय? नोटाबंदी, जीएसटी वगैरेसारख्या संकटांमुळे आपण मंदीच्या फेऱ्यात आहोत, असे राजकीय आरोप सर्वत्र होत आहेत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांना या मंदीचा किती फरक पडलाय हो? महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या बातम्या गेल्या सत्तर वर्षांत किती वेळा वाचल्या असतील. पण, याच महागाईने कंबरडे मोडलेला आयएएस, सरकारी अधिकारी पाहिला आहे का कुणी?

भ्रष्टाचार झिरपत झिरपत आयएएसपासून शिपायांपर्यंत आला. प्रत्येकाचे दर निश्चित झाले. देणाऱ्याने देत राहावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे, या न्यायाने देवाण-घेवाणीच्या प्रथा-परंपरा प्रत्येक दिवाळसणागणिक अधिक दृढ होत गेल्या. आज दिवाळीची गिफ्ट्स वाटली जात नसल्याचे दुःख नक्की कुणाला होतेय?

राजकीय नेत्यांना दर पाच वर्षांनी बदलण्याची शक्ती लोकशाहीने मतदारांना दिली खरी. पण, या भ्रष्ट बाबूंचे काय? दर तीन वर्षांनी किमान बदलीचे नियमही पायदळी तुडवणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आज वर्षानुवर्षे मुंबईत, मंत्रालयात किंवा इतर सरकारी कार्यालयांमध्ये मलईदार पोस्टिंगवर चिकटलेले मुंगळे बाजूला कोण करणार?

सर्वपक्षीय नेत्यांना दोष जातोच. कारण, नेते, अधिकारी आणि कंत्राटदार या नेक्ससमुळेच आजवरचे घोटाळे झाले. नेत्यांना पैसे खाण्याची दिशा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आजपर्यंत काय कारवाई झाली? सत्ता बदलली. 'भ्रष्टाचार संपवू' वगैरे वल्गना करणारे दाऊदला मुसक्या बांधून आणण्याच्या थाटातच सत्ता राबवत आहेत. त्यामुळे, अधिकाऱ्यांचेही फावलेय.

यंदाची दिवाळी ही तुम्हा-आम्हाला भलेही दिवाळं वाटत असेल. पण, तरीही काटकसरीने का होईना साजरी होईलच. परंतु, या खादाडांचे काय?

मीडियाला भ्रष्ट ठरवणारे याच मीडियातील अनेकांना गिफ्टरुपी लाच देण्यात पुढे नाहीत काय? बहुतेक सर्व मंत्र्यांच्या, नेत्यांच्या सरकारी तसेच खाजगी पीआरओ, पीएंकडे मीडियातल्या प्रत्येकाची यादी तयार असते. कुणाला कोणते गिफ्ट द्यायचे हेही ठरलेले असते. कशासाठी हे सारे? आज जगात फुकट कुणीच कुणाला काही देत नाही. मग हे प्रेम नक्की कशासाठी? आपले धंदे झाकण्यासाठी दुसऱ्याला नको त्या सवयी लावण्याचे उद्योग थांबवा आता.

आमच्या गुरुंनी सांगितले होते की, गिफ्ट घ्या अगर नका घेऊ, तुमच्या नावावर गिफ्ट निघाले की ते कुणा ना कुणाच्या घरात जाणारच. मग तुम्ही घेऊन योग्य वाटेल त्या व्यक्तीला द्या. मात्र, गिफ्टमुळे बातमी देण्यावर कोणताही दबाव येऊ देऊ नका. अर्थात, बोलायला ठीक आहे, पण वागायला सर्व तसे वागतील याची खात्री ज्याची त्यानेच द्यायची असते.

'पत्रकारांना काय दारु आणि जेवण घातले की झाले' असे ऐकवणारे एक नेते पुन्हा मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यांच्यासारख्याच्या पदरी असणारे अधिकारीही तसाच विचार करणारे असल्याने जगात सारे काही विकत घेता येते, या वृत्तीची वाढ होते आहे.

खरंतर भ्रष्टाचार वाढवण्यास हेच गिफ्टकल्चर कारणीभूत आहे. आजकाल तर गिफ्टसंस्कृती प्रत्येक कंत्राट, कामागणिक फोफावली आहे. काम अलॉट झालं की गिफ्ट, चेक मिळाला की गिफ्ट, असा गिफ्टचा पाऊस दररोज पडतोय. मग, दिवाळीचे गिफ्ट हे देणाऱ्यांसाठी एकप्रकारे ओझेच बनले आहे. तरीही गिफ्टशिवाय पान हलत नाही.

भविष्यात खरोखरच दिवाळसण साजरा करायचा असेल, तर ही गिफ्टसंस्कृती संपवायला हवी. म्हणजे, भेटी देण्यामागची दबावाची मानसिकता बदलायला हवी. आणि, हे गिफ्टकल्चर संपले, तर कदाचित भ्रष्टाचार कमी होण्यासही मदतच होईल!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा