Advertisement

निष्ठावंतांना डावलून प्रसाद लाड यांना भाजपाची उमेदवारी


निष्ठावंतांना डावलून प्रसाद लाड यांना भाजपाची उमेदवारी
SHARES

राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंतांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र भाजपाने अचानक भांडारी यांचा पत्ता कट करत प्रसाद लाड यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ घातली आहे.


नारायण राणे यांचा विधान परिषेदतला पत्ता कट

शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधान परिषेदतला पत्ता कट झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना लॉटरी लागली आहे. सोमवारी 11 वाजेच्या सुमारास प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज भरला. 

दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला आहे. पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.


राणे-मुख्यमंत्र्यांमध्ये दोन तास चर्चा


काँग्रेसला सोडून एनडीएमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी रविवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळते.

राणेंच्या भेटीनंतर लगेचच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भाजपा उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले.



या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार. रविवारी रात्री मी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. माझं काम पाहून पक्षाने हा निर्णय घेतला आहे. वादा किया ओ निभाना पडेगा ही भाजपाची सवय आहे. त्यामुळे मी भाजपा पक्ष वाढवण्यासाठी कायम काम करेन.

- प्रसाद लाड, भाजपा उमेदवार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा