मतदान केंद्रावर वयोवृद्ध आणि अपंगासाठी डोली

Mumbai
मतदान केंद्रावर वयोवृद्ध आणि अपंगासाठी डोली
मतदान केंद्रावर वयोवृद्ध आणि अपंगासाठी डोली
मतदान केंद्रावर वयोवृद्ध आणि अपंगासाठी डोली
मतदान केंद्रावर वयोवृद्ध आणि अपंगासाठी डोली
मतदान केंद्रावर वयोवृद्ध आणि अपंगासाठी डोली
See all
मुंबई  -  

मुंबई - मुंबई महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात असून, मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. मुंबईतील 24 विभाग कार्यालयांमधील 1582 ठिकाणी 7304 मतदान केंद्र उभारण्यात आली आहे. यापैकी सुमारे 1100 मतदान केंद्र हे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी वयोवृद्ध आणि अपंगांसाठी विशेष डोलीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या 21 फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीत एकूण 2275 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. 

या निवडणुकीत 91 लाख 80 हजार 491 मतदार भाग घेणार आहेत. यामध्ये 50 लाख 30हजार 361 पुरुष आणि 41 लाख 49 हजार 749 महिला मतदार आहेत. तर 381 इतर अशाप्रकारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात होईल आणि साडेपाच वाजता मतदान प्रक्रीया बंद होईल. परंतु संध्याकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपुष्टात आल्यानंतर रांगेत असलेल्या शेवटच्या मतदाराला एक क्रमांकाची चिठ्ठी देऊन मतदानाचा हक्क बजावण्यास दिला जाईल,असे देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उपायुक्त बापू पवार आणि सहायक आयुक्त संजोग कबरे उपस्थित होते.

खुल्या मतदान केंद्राची संख्या झाली कमी
मतदानाकरता बंदिस्त मतदान केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी खुल्या मतदान केंद्राची संख्या १२०० होती. ती यंदा ८२७ एवढी करण्यात आली आहे.

एकूण 7347 मतदान यंत्राचा वापर
मुंबईत एकूण 7347 मतदान केंद्रे असून, यासर्व मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान यंत्राचा वापर केला जाईल. प्रभाग 164 मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 31 उमेदवार आहेत. याठिकाणी 3 बॅलेट युनिट्स लावण्यात येतील. तसेच 37 ठिकाणी 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्यामुळे 2 बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहे. तर उर्वरीत केंद्रावर प्रत्येकी बॅलेट युनिट अर्थात मतदान यंत्र बसवण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पेड न्यूजच्या तीन तक्रारी
निवडणुकीदरम्यान वृत्तपत्रात उमेदवारांसोबत आलेल्या वृत्तांबाबत पेडन्यूज संदर्भात तीन तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींबाबत उमेदवारांना नोटीस पाठवून त्याचा खुलासा मागवण्यात येत आहे. तसेच प्रकाशकांनाही नोटीस पाठवण्यात येत आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांच्यासोबत पडताळणी काम सुरु आहे. जर पेडन्यूज असल्याचे सिद्ध झाल्यास उमेदवारांच्या खर्चात धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भिंतीपत्रके चिकटवणाऱ्या उमेदवारांवरही कारवाई
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही उमेदवाराला प्रचारासाठी स्टिकर किंवा पत्रके चिकटवता येत नाहीत. परंतु अनेक पक्षांच्या उमेदवारांनी भिंतीवर पत्रके चिकटवली आहेत. त्यामुळे यांच्याविरोधात तक्रारी आल्यास, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. भिंतीवर चिकटवलेले स्टिकर तसेच पत्रके काढून टाकण्याचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करण्यात येईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

मतदानासाठी 42 हजार 797 कर्मचारी
मतदानाच्या प्रक्रियेसाठी 42 हजार 797 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासर्व कर्मचाऱ्यांची २ प्रशिक्षणे पूर्ण झाली आहेत. येत्या 20 तारखेला अंतिम प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी बेस्टकडून 724 बसेस, आरटीओकडून 3449 बसेस तर परिवहन विभागाकडून 2106 टॅक्सी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच मतदार ओळख चिठ्ठयांचे वाटप ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत वाटप रविवारपर्यंत पूर्ण होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत 705 संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्र
मुंबईत एकूण 7303 मतदान केंद्रांपैकी 705  संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. यामध्ये 17 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर 688 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मागील वेळेस ज्या घटना घडल्या होत्या, त्याआधारे पोलिसांनी ही मतदान केंद्र निश्चित केली आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.