Advertisement

राजकारण सोडून लेखक व्हा; फडणवीसांना अजितदादांचा सल्ला

फडणवीसांच्या ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करून घेऊ. तर महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाची त्याला एकमताने मान्यता राहील.

राजकारण सोडून लेखक व्हा; फडणवीसांना अजितदादांचा सल्ला
SHARES

'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक पाहिले तर फडणवीस हे उत्तम साहित्यिक होऊ शकतात, असे मला जाणवायला लागले आहे. त्यामुळे तुम्ही राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नाही, असा टोला वजा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांना दिला.

हेही वाचाः- ​नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधले​​​

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीस यांना टोले लगावले. फडणवीस यांनी लिहिलेलं पुस्तक अत्यंत चांगलं आहे. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगण्याचं काम केलं आहे. हे पुस्तक वाचून ते उत्तम साहित्यिक होऊ शकतात याची खात्री पटली असं सांगतानाच भाजप नेते राम नाईक तुम्हीही या कार्यक्रमाला हजर आहात. तुम्ही जरा वर दिल्लीला सांगितलं की हे साहित्यिक आहेत, यांना बरंच ज्ञान आहे आणि फडणवीसांच्या ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करून घेऊ. तर महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाची त्याला एकमताने मान्यता राहील. असे झाल्यास सुधीर मुनगंटीवार यांनाच त्याचा सर्वाधिक आनंद होईल. गळ्याची आण खोटे बोलत नाही, असा चिमटा अजित पवार यांनी काढताच सभागृहात एकच खसखस पिकली.


हेही वाचाः-​मुंबईतील 'या' ठिकाणी २०३ लोकांचा मृत्यू​​​

 यावेळी पवार यांनी यंदाच्या पहिल्या टर्ममधील सर्व सदस्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचण्याचे आवाहन करत फडणवीस यांना भावी वाटचालीबद्दल शुभेच्छाही दिल्या. अर्थमंत्री असताना मी पहिला अर्थसंकल्प सभागृहात मांडला होता. त्यावेळी सगळे विरोधी आमदार सभागृहात गोंधळ घालत होते. मात्र, एकच सदस्य कानाला एअरफोन लावून अर्थसंकल्प ऐकत होता. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, अशी आठवण सांगतानाच त्या दिवशी सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांचा गोंधळ अधिकच सुरू होता. फडणवीसांनी त्यांना थोडं समजावून सांगावं असं मला वाटत होते. महाजन-मुनगंटीवारांचा गोंधळ सुरूच होता. कानाला एअरफोन लावून अर्थसंकल्प ऐकणारा हा आमदार पुढे मुख्यमंत्री होईल आणि त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल, असे या दोघांनाही वाटले नसेल, असा टोला त्यांनी हाणताच एकच हशा पिकला.

संबंधित विषय
Advertisement