काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.
राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष असतील. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती असतील. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी यांनी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे देशभरातील 900 नेते काँग्रेस मुख्यालयात उपस्थित होते. राहुल गांधींच्या उमेदवारीचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नेते दिल्लीतील अकबर रोड इथल्या मुख्यालयात दाखल झाले होते.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस नेते शहजाद पूनावाला यांनी विरोध दर्शवला आहे. 'काँग्रेसच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे', अशी टीका त्यांनी केली.
'शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत केलेले वक्तव्य हे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी आहे. ते काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधीसुद्धा नाहीत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही', अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
'शहजाद पूनावाला यांनी चमकोगिरी करण्याशिवाय काँग्रेस पक्षासाठी काहीही काम केलेले नाही, ते निष्क्रीय आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे सुरू आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे'.