Advertisement

शेकडो मनसैनिक मुंबईत दाखल, ‘असा’ आहे मनसेच्या मोर्चाचा मार्ग


शेकडो मनसैनिक मुंबईत दाखल, ‘असा’ आहे मनसेच्या मोर्चाचा मार्ग
SHARES

देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातून शेकडो मनसैनिक मुंबईत येऊन दाखल झाले आहेत. नवी राजकीय भूमिका स्वीकारल्यानंतरचा मनसेचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या मनसेनं काही दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या पहिल्या महाअधिवेशनात पक्षाचा झेंडा बदलून भगव्या रंगाचा केला. त्यावरूनच मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. याच अधिवेशनात राज ठाकरे यांनी मुंबईतील घुसखोरांचा मुद्दा उचलत त्यांना देशाबाहेर हाकलून देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. 

त्यानंतर मनसेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जागोजागी बैठका घेतल्या. जागोजागी पोस्टर्स बॅनर लावण्यात आले, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट टाकत वातावरण निर्मिती करत कार्यकर्त्यांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यानुसार रविवारी दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. 

मनसेच्या मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्ते पुढे असतील आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात प्रवेश करतील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटच्या माध्यमातून आझाद मैदानात येतील.

आझाद मैदानात भव्य स्टेज उभारण्यात आला असून तिथं आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. त्यानंतर शेवटी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा काढण्यामागचा नेमका उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा