Advertisement

फक्त इच्छा नको, सीएम पदाचा आग्रह धरा, रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला

काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारकडे सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

फक्त इच्छा नको, सीएम पदाचा आग्रह धरा, रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला
SHARES

एका बाजूला काँग्रेस महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असताना, मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नही रंगवलं जाऊ लागलंय, त्यावर फक्त इच्छा नको, तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारकडे सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

याबाबत मत मांडताना रामदास आठवले यांनी नमूद केलं आहे की, फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर मविआ सरकार पडेल. काँग्रेसने (congress) सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. जर त्यांना सीएम पद दिले जात नसेल, तर काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा, असं माझं नाना पटोले यांना आवाहन आहे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

सध्या महाराष्ट्रात काँग्रेस ही महाविकास आघाडी सरकारमधील सत्तेतील भागीदार आहे. तिन्ही पक्षांच्या विचारसरणीत फरक असला, तरी सत्तापदे राखण्यासाठी तिन्ही पक्ष एकमेकांसोबत तडजोड करताना दिसत आहे. त्यात अधूनमधून होणाऱ्या कुरबुरीही समोर येताना दिसतात. काँग्रेसला निर्णयप्रक्रियेतून डावललं जात असल्याची तक्रार तर जुनीच आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचं असेल, तर स्वबळाचा नारा दिलाच पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्यासहीत इतर नेत्यांनीही घेतली आहे.

हेही वाचा- काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का, नाना पटोले यांची ठाम भूमिका

त्याबाबत बोलताना, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही आमचं समर्थन दिलेलं आहे. हे सरकार ५ वर्षे राज्यात टिकेल. आमच्या दृष्टीने मुख्य मुद्दा हा आहे की पक्षाची ताकद आजमवण्यासाठी आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ असा नाही की सरकारला काही धोका आहे. हे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्याला आमचं पूर्ण समर्थन राहील, असं नाना पटोले म्हणाले होते.

सोबतच महाराष्ट्र (maharashtra) असं एक राज्य आहे, जिथं काँग्रेसला मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे. या वर्गाला असं वाटतं की काँग्रेस स्वबळावर राज्यात सत्तेत यावं. कार्यकर्त्यांच्या मनात देखील हीच इच्छा आहे. म्हणूनच येऊ घातलेल्या निवडणुका मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत किंवा विधानसभा निवडणुका काँग्रेसने त्या स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा- कोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा