Advertisement

उदयनराजेंना स्वाभिमान आणि आरपीआयकडून आवताण!

उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असताना त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आरपीआयने उमेदवारी देण्याची तयारी दर्शवत आपल्या पक्षात येण्याचं आवताण दिलं आहे.

उदयनराजेंना स्वाभिमान आणि आरपीआयकडून आवताण!
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असताना त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आरपीआयने उमेदवारी देण्याची तयारी दर्शवत आपल्या पक्षात येण्याचं आवताण दिलं आहे. काँग्रेस सोडून आपण लवकरच स्वाभिमान पक्षात जाणार असल्याचं म्हणणारे नितेश राणे यांच्यासोबत आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उदयनराजे यांना आॅफर दिली आहे.


उमेदवारीवर खल

उदयनराजे यांच्यावर साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट प्रचंड नाराज आहे. त्यामुळेच उदयनराजे यांच्याएेवजी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये यासाठी हे आमदार जोरदार प्रयत्न करत असून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत ही मागणी आमदारांनी पोहोचवली आहे. तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीतही यावर चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्याकडून अद्याप यावर काहीही निर्णय आला नसला तरी उदयनराजेंच्या उमेदवारीवरून चांगलाच खल सुरू आहे.


तरच माघार...

उदयनराजे मात्र उमेदवारीवर ठाम असून साताऱ्यातून माझा लीड तोडणारा कुणी असेल तर मी नक्कीच माघार घेईन, असं म्हणत आपल्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांनाच आव्हान दिलं आहे. मला विरोध करण्याआधी माझी ताकद किती आहे हे पक्षानं पाहिलं पाहिजे असं म्हणत उदयनराजे अजूनही साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणारच असं सांगताना दिसत आहेत.


ताकदवान नेते

दुसरीकडे, मात्र उदयनराजे यांना स्वाभिमान आणि आरपीआयसारख्या पक्षांकडून आॅफर येताना दिसत आहेत. आरपीयआयमध्ये उदयनराजे आल्यास त्यांना आपण निवडून आणू, असं म्हणत आठवले यांनी उदयनराजे यांना आॅफर दिली आहे. तर नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे उदयनराजे यांना स्वाभिमानी पक्षात यावं अशी आॅफर दिली आहे. उदयनराजे ताकदवान नेते आहेत तेव्हा त्यांनी स्वाभिमान पक्षात यावं असं म्हणत आपणही लवकरच स्वाभिमानी पक्षात प्रवेश करणार असल्याचंही नितेश राणे यांनी ट्विटरमधून जाहीर केलं आहे.



हेही वाचा-

उदयनराजेंच्या उमेदवारीला जोरदार विरोध?

मुंबई पत्रकार संघाबाहेर राष्ट्रवादी, सनातनचे कार्यकर्ते भिडले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा