Advertisement

संजय निरुपम यांची कॉग्रेसमधून हकालपट्टी

संजय निरुपम यांनी असा दावा केला आहे की त्यांनी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यापूर्वी राजीनामा दिला होता

संजय निरुपम यांची कॉग्रेसमधून हकालपट्टी
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. पण संजय निरुपम यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी आधीच राजीनामा दिला होता. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.

पक्षाविरोधात भाष्य केल्याने संजय निरुपम यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. लोकसभेसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून बुधवारी सायंकाळी निरुपम यांना वगळण्यात आल्यानंतरच त्यांना निलंबित केलं जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

बुधवारी सायंकाळी राज्यातील काँग्रेस कमिटीकडून निरुपम यांना निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आला.

निरुपम यांनी काँग्रेसच्या 'इंडिया' आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबद्दल आणि गटाचे नेते उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. लोकसभेसाठी ठाकरे गटाने वायव्य मुंबईच्या जागेवर उमेदवार जाहीर केल्यानंतर निरुपम यांनी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात विधान केलं होतं.

काँग्रेसचे सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीसहीत जारी करण्यात आलेल्या पत्रामध्ये, "बेशिस्त आणि पक्षविरोधी वक्तव्यासंदर्भातील तक्रारींची दखल घेत काँग्रेस अध्यक्षांनी श्री संजय निरुपम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यास मान्यता दिली आहे," असं नमूद केलं आहे. 

बुधवारीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, "आम्ही त्यांना (निरुपम यांना) स्टार प्रचारकांच्या यादीमधून काढून टाकलं आहे. तसेच त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भातील कारवाई करण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत," असं सांगितलं होतं. 

स्टार प्रचारकांच्या यादीमधून निरुपण यांना काढल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच आपण आपली पुढील भूमिका उद्या मांडू असं निरुपम यांनी म्हटलं होतं. 

महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाने 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. 27 मार्च रोजी ही यादी जाहीर झाल्यानंतर निरुपम यांनी ठाकरे गटावर टीका केलेली. या यादीमध्ये अमोल किर्तीकर यांचाही समावेश असल्याच्या मुद्द्यावरुन निरुपम यांनी असहकाराची भूमिका घेतली.  तसेच त्यांनी किर्तिकर यांना पाठिंबा देणार नाही असं सांगताना 'खिचडी घोटाळा' करणाऱ्यांना समर्थन करणार नाही असंही म्हटलेलं.

"ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईत पाच जागा देण्यात आल्या आहेत ते पाहता हा काँग्रेसला मुंबईतून संपवण्याचा प्लॅन वाटतो. असं वाटतंय की शिवसेनेनं काँग्रेसला गुडघ्यावर आणलं," अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी नोंदवली होती.

"काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुन शिवसेना ठाकरे गटाबरोबरची युती तोडावी. शिवसेनेला वाटत असेल की ते एकटे लढू शकतात तर ही त्यांची मोठी चूक आहे," असंही निरुपम म्हणाले. निरुपम यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'उरल्या सुरलेल्या शिवसेनेचे प्रमुख' असा केला होता. याच मुद्द्यांवरुन आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


हेही वाचा

दृष्टीहीन मतदारांसाठी ऑडिओ आणि ब्रेल लिपीचा वापर करण्यात येणार 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा