शिसवेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना हटवले आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे.
सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात. म्हणजेच, किर्तीकरांचा व्हीप संजय राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते.
संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर लोकसभेत एकूण 18 खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत 13 खासदार आहेत. तर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत.
मागील काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.
गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच आणखी खासदाराने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
हेही वाचा