Advertisement

Live Updates: राम मंदिर उभारण्याची तारीख सांगा, उद्धव यांचं भाजपाला अल्टिमेटम

उद्धव २४ आणि २५ नोव्हेंबर असे दोन दिवस अयोध्या नगरीचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी शिवसैनिकांनी उद्धव यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. ठिकठिकाणी भगव्या पताका, स्वागताचे प्रचंड मोठे होर्डिंग्ज अयोध्येत लावण्यात आले आहेत. शिवसैनिकांसह साधू-संत-महंत देखील अयोध्येत दाखल झाले आहेत.

Live Updates: राम मंदिर उभारण्याची तारीख सांगा, उद्धव यांचं भाजपाला अल्टिमेटम
SHARES

''पहले मंदिर, फिर सरकार'', असा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी विशेष विमानाने सहकुटुंब अयोध्येला पोहोचले आहेत. उद्धव यांच्या आधीच हजारो शिवसैनिक 'जय श्रीराम', 'जय भवानी, जय शिवाजी', असा जयघोष करत अयोध्येत पोहोचल्याने अयोध्येत जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.


6.45 - शरयू किनारी महाआरती संपन्न

6.30 - मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात महाआरतीला जमले शेकडो शिवसैनिक


6.15 - शरयू नदी किनारी वेद मंत्रोच्चारात महाआरतीला सुरुवात

6.00 - उद्धव ठाकरे शरयू नदीकिनारी दाखल

5.30 - शरयू नदी किनारी महाआरतीची जय्यत तयारी, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शरयू नदी किनारी जाणार

5.00 - शरयू नदीकाठ भगव्या पताका, झेंड्यांनी सजला, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक नदीकाठावर दाखल

4.42 - आता हिंदू स्वस्थ बसणार नाही, तर तो प्रश्न विचारणारच - उद्धव

4.41 - राम मंदिर उभारण्यासाठी आता किती वर्षे वाट बघणार? मंदिर वही बनाएंगे लेकीन तारीख नही बनाएंगे हे आता चालणार नाही, आम्हाला मंदिर उभारण्याची नक्की तारीख सांगा - उद्धव

4.40 - न्यायालयाने निर्णय देण्याआधी सरकारने मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणावा, शिवसेना त्याला पाठिंबा देईल- उद्धव

4.38 - मी प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे, राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. प्रभू श्रीरामाचं मंदिर झालंच पाहिजे- उद्धव

4.30 - उद्धव ठाकरे यांच्या नियोजीत कार्यक्रमात बदल, केवळ उद्धव ठाकरे उद्या रामलल्लाचं दर्शन घेणार आणि पुढे पत्रकार परिषद घेणार, रात्री ११ वाजता अयोध्येतून निघणाऱ्या विशेष रेल्वेतून शिवसैनिक पुन्हा मुंबईला परतणार, कार्यक्रमस्थळी शिवसैनिकांना निर्देश

4.10 - लक्ष्मण किला इथं संत, महंतांच्या उपस्थितीत विधीवत संकल्प पुजेला सुरूवात, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुजेत सहभागी सहकुटुंब गौरी पूजन, गणेश पूजन आणि कलश पूजन केलं

4.00 - शिवसेनेचे उत्तर प्रदेशातील राज्य प्रमुख ठाकूर यांनी रामंदिर निर्माणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चांदीची वीट सुपूर्द केली


4.00- सीआरपीएफ, पोलिसांच्या तुकड्या अयोध्येत दाखल, अयोध्येला छावणीचं स्वरूप

3.50- उद्धव ठाकरे यांचं पुष्पवृष्टी करून लक्ष्मण किला इथं स्वागत, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी


3.39- उद्धव ठाकरे सहकुटुंब लक्ष्मण किला इथं दाखल


3.00- उद्धव ठाकरे पंचवटी अतिथीगृहातून लक्ष्मण किलाच्या दिशेने रवाना

2.45 - थोड्याच वेळात उद्धव लक्ष्मण किलासाठी रवाना होतील

2.00 - फैजाबादमध्ये उद्धव यांचं जंगी स्वागत, जागोजागी शिवसैनिक, हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामचा नारा

1.45 - उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री पंचवटी अतिथीगृहात दाखल


1.30: वाजेच्या सुमारास उद्धव यांचं फैजाबाद विमानतळावर आगमन झालं.शिवसेना खासदार संजय राऊत, चंद्रकांतखैरे, सचिव मिलिंद नार्वेकर, खा. अनिल देसाई. इ. नेत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात उद्धव यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर उद्धव यांचा ताफा लक्ष्मण किलाच्या दिशेने रवाना झाला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा जय श्रीरामचा नारा देणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.


स्वागताची तयारी

उद्धव २४ आणि २५ नोव्हेंबर असे दोन दिवस अयोध्या नगरीचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी शिवसैनिकांनी उद्धव यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. ठिकठिकाणी भगव्या पताका, स्वागताचे प्रचंड मोठे होर्डिंग्ज अयोध्येत लावण्यात आले आहेत. शिवसैनिकांसह साधू-संत-महंत देखील अयोध्येत दाखल झाले आहेत. खा. संजय राऊत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर सर्व कार्यक्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


सोबत कोण?

उद्धव सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास 'मातोश्री' निवासस्थानाहून कुटुंबासमवेत मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे देखील आहेत. काही वेळाने ते मुंबई विमानतळावर पोहोचले. तिथून ते विशेष विमानाने दुपारी १.३० वाजेच्या सुमारास फैजाबाद एयरपोर्टवर उतरले.


'असा' असेल दौरा

विमानतळावर उतरल्यावर उद्धव २ वाजेच्या सुमारास लक्ष्मण किल्ला येथे जातील. त्यानंतर ते श्री विद्वत संत पूजन आणि आशीर्वादोत्सव कार्यक्रमात सहभागी होतील. तिथं ते साधू-महंतांचे आशीर्वाद घेतील. सायंकाळी ५.१५ वाजता ते नया घाट इथं जाऊन शरयू नदीच्या तिरावर राम आरती करतील.

रविवार २५ नोव्हेंबरला ते सकाळी राम जन्मभूमी इथं जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतील. दुपारी १२ वाजता अयोध्येत ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर १ वाजता ते अयोध्यावासीयांसोबत संवाद साधतील. ३ वाजता ते मुंबईला परतण्यासाठी विमानतळाच्या दिशेने रवाना होतील.


धर्मसभेचं आयोजन

रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अंदाजे १ लाख संत येण्याची शक्यता आहे. उद्धव यांचा दौरा आणि धर्मसभा यामुळे अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


कडक सुरक्षा व्यवस्था

शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ADGP स्तराच्या पोलिस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय ३ SSP, १० ASP, २१ DSP, १६० इंस्पेक्टर, ७०० कॉन्स्टेबल, PAC ची ४२ कंपनी, RAF ची ५ कंपनी आणि ATS कमांडो सुरक्षेसाठी तैनात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने परिसरावर नजर ठेवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा