Advertisement

मुंबईतील ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का?


 मुंबईतील ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का?
SHARES

मुंबई - ‘आवाज कुणाचा’ या घोषणेवर आता फक्त एका पक्षाची मक्तेदारी राहिली नाही, हे मुंबई महापालिकेच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. कमळाने वाघाबरोबरच इंजिनालाही डिरेल केले आणि काँग्रेसलाही हात दाखवला हे मान्य करावेच लागेल. आता महापौर कुणाचा यावरून पुढचे काही दिवस राजकारण रंगेल आणि शेवटी तंगड्यात तंगडे घालणारेच हातात हात घालून खुर्चीवर बसतील.

227 जागा लढवून शिवसेनेने 2012 मधील 75 जागांच्या तुलनेत 9 जागा जास्त मिळवत 84 चा आकडा गाठला. तर भाजपाने 2012 च्या 31 जागांवरून 82 जागांवर उडी मारली. या सर्वांना टेंडरच्या टक्केवारीची भाषा अधिक समजते, हे लक्षात घेऊन सांगायचे तर शिवसेनेच्या जागांची टक्केवारी 37 टक्के, तर भाजपाची 42 टक्क्यांवर पोहोचते. थोडक्यात, महापालिकेतील टक्केवारीच्या गणितात आता भाजपाचा टक्का वाढलाय, हेच खरे!

या सर्व निकालांमधून आणि मराठीच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मारलेल्या मुसंडीतून शिवसेनेला भविष्यातील धोका नक्कीच लक्षात आला असावा. राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या शिवसेनेला प्रादेशिक पक्ष म्हणून ट्रीटमेंट देणाऱ्या भाजपाच्या दिल्लीश्वरांनी काँग्रेसबरोबरच शिवसेनेलाही संपवण्याचा चंग बांधल्याची लक्षणे दिसत आहेत. प्रादेशिक पक्षावरून शिवसेनेला केवळ ठाणे आणि मुंबई महापालिकेपुरते मर्यादित करून शिवसेनेच्या बार्गेनिंग पॉवरचेच खच्चीकरण सुरू केले आहे.

मुंबईत महापौर आमचाच आणि भावी मुख्यमंत्रीही आमचाच अशी घोषणा करून उद्धव ठाकरेंनी वाघनखे शाबूत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी पुढची गणितं सोपी नाहीत. मनसेच्या राज ठाकरेंची टाळी चुकवून दोघा भावांमधील दुरावा कमी झालेला नाही, हेच समोर आणले गेले. मनसेचे अस्तित्व शाबूत राहिले हेच नसे थोडके, अशी अवस्था असल्याने एकही मारा सॉलीड मारा डायलॉग मारणाऱ्यांबाबत अधिक काही न बोललेलेच बरे. परंतु, मुंबईतील ठाकरेंचा आवाज या निवडणुकीने नियंत्रणात आणला, हे मात्र खरे. गेल्या वेळेपेक्षा शिवसेनेच्या जागा वाढल्याने ताकद वाढली असे दावे जरी केले गेले तरी या आवाजाचा डेसिबल कमी करण्यात कमळाने बाजी मारली आहे. त्यातच लोकांमधून निवडून न आलेल्या शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे खिशात असल्याच्या कितीही गमजा मारल्या तरी प्रत्यक्षात देण्याचे धाडस ते दाखवतील का, हाच प्रश्न आहे. जर, शिवसेनेने राज्यातील सत्तेतून बाहेर पडून मध्यावधी निवडणुकांची परीक्षा लादण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेतील आमदारच गटाने फुटून ही परीक्षा होऊ न देण्याची शक्यता अधिक आहे. याचेच टेंशन घेऊन मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंना झेलायचे आहे.

खरंतर, महापालिका निवडणुका मॅन टू मॅन मार्किंग या तत्त्वावर होतात असे म्हणतात. परंतु, या निवडणुकीतही थेट पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्याचा उद्धव, राज आणि इतर पक्षांचा प्रयत्न बहुधा मतदारांना भावला नसावा. त्रासदायक ठरलेल्या नोटबंदीसारख्या मुद्यांनाही मतदारांकडून भीक घातली गेली नाही. तसेच, भ्रष्टाचाराला काऊंटर करणारा पारदर्शकतेचा मुद्दाच बऱ्यापैकी प्रभावी ठरला. करून दाखवले सांगणाऱ्यांकडे प्रत्यक्षात काहीच दाखवण्यासारखे नव्हते. गंमत म्हणजे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या पापात तेवढाच वाटा असणाऱ्या छोट्या भावाच्या रुपातील भाजपाला मात्र यातून सवलत देण्याची खेळी मतदारराजा खेळला.
आता निकालानंतर पैसे वाटल्याचा आरोप, हरणाऱ्या प्रत्येकाकडून होत असला तरी तो एकप्रकारे मतदान करणाऱ्यांचा अवमानही ठरतो. अर्थात, मतदानावेळी पैसेवाटप ही लोकशाहीची शोकांतिकाच असली तरी निकालानंतर जो निकाल आहे तो मान्य करण्याची खिलाडूवृत्ती दाखवण्यातच मोठेपणा असतो.

दुसरीकडे, राजगडावरील छोट्या ठाकरेंचाही आवाज बसण्यास ते स्वतःच जबाबदार ठरले आहेत. उद्धवने टाळी नाकारल्यानंतरही प्रचारात उशिराने उतरणे राज ठाकरेंच्या चांगलेच अंगलट आले. त्यांनी दाखवलेले नाशिकच्या विकासाचे प्रेझेंटेशन त्यांच्या ब्लू प्रिंटसारखेच क्षणभंगुर ठरले. मुंबईकरांनी नाशिकचे दौरे कदाचित केले तरी नसावेत किंवा राज ठाकरेंच्या बोलबच्चनगिरीवर आता कुणाचा विश्वास राहिलेला नाही, हेच यातून स्पष्ट होते.

शेवटी, बाळासाहेबांच्या एका डरकाळीवर मुंबई बंद पाडणाऱ्या शिवसेनेचा आवाज आता बसलाय. खरंतर दातखीळ बसली असंच म्हणायचं होतं, पण अजूनही मुंबईतील शिवसेनेचे शाखा नेटवर्क पक्षाला तारत आहे. आता कफ सिरप घ्यायचे की गुळण्या करायच्या हेच उद्धव ठाकरेंना ठरवायचे आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा