SHARE

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत धामधूम सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक नुकतीच वांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत सर्वच आमदारांनी शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली. शिवाय जोपर्यंत भाजपकडून लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत सत्तास्थापनेबाबत कुठलाही निर्णय घेण्यात येऊ नये, अशी विनंतीही या आमदारांनी पक्षप्रमुखांना केली. 

फाॅर्म्युला काय?

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मातोश्रीवर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना जागा वाटपात आणि सत्तेत ५०-५० टक्के वाटा असा फाॅर्म्युला ठरवला होता. असं असूनही भाजपने जागा वाटपात शिवसेनेची कमी जागांवर बोळवण केली हाेती. 

अडचण सांगू नका

त्यावेळेस शिवसेनेने भाजपची अडचण समजून घेतली असली, तरी सत्तास्थापनेत निम्मा निम्मा वाटा देताना कुठलीही अडचण सांगू नका, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यानुसार भाजप ठरल्याप्रमाणे वागली नाही तर इतर पर्याय खुले असल्याचंही उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना सांगितलं. 

आम्ही सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत अडीच-अडीच वर्षे फाॅर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं, अशी सर्वच आमदारांची मागणी केली आहे. तसंच भाजपकडून लेखी पत्र मिळाल्याशिवाय पुढचं पाऊल टाकू नये, अशी आक्रमक भूमिका देखील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी बैठकीत घेतल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

दिवाळीनंतर बैठक

शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये दिवाळीनंतर बैठक घेतली जाईल. या बैठकीत सत्ता स्थापनेवर चर्चा होईल प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांच्या मागण्या असतात. तशी मागणी शिवसेनेतूनही करण्यात आल्याचं भाजपचे नेते आणि खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.


हेही वाचा-

राज्यात स्पष्ट बहुमतासह पुन्हा महायुतीच

आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले - उद्धव ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या