Advertisement

‘ब्रँड ठाकरे’असला, तरी…

पक्षाचा उणापुरा एक आमदार असताना, कुठलंही सत्तापद नसताना अडचणीत सापडलेले लोकं मातोश्रीची नाही, तर कृष्णकुंजची वाट धरतात, यातच 'ठाकरे ब्रँड'ची विश्वासर्हता अधोरेखित होते.

‘ब्रँड ठाकरे’असला, तरी…
SHARES

परवा शाॅपिंग माॅलमध्ये गेलो होतो, बऱ्याच वस्तू खरेदी करायच्या होत्या. घरून सामानाची लिस्ट देण्यात आली. सोबत अमूक एक वस्तू अमूक ब्रँडचीच आण, नको त्या वस्तू उचलून घेऊन येऊ नकोस, असं मला अनेकदा बजावण्यातही आलं. त्यावर ब्रँडपेक्षा आतली वस्तू चांगली नको का? या माझ्या साध्या प्रश्नाने घरच्यांच्या चेहऱ्यावर कुत्सीत हास्य उमटलं. त्यानंतर वाढलेल्या त्यांच्या आवाजापुढं माझा समजूतदारपणा सहज चेपला गेला. मी निमूटपणे घरातून काढता पाय घेतला आणि काही वेळाने त्यांना हव्या त्या ब्रँडच्या वस्तू आणून दिल्या. माॅरल आॅफ द स्टोरी… घरातली एकही व्यक्ती माझं ऐकत नाही… हा मुद्दा तर आहेच... पण..

एरवी आपण कपड्यापासून बुटापर्यंत, मोबाईलपासून गाडीपर्यंत सगळ्या गोष्टींचं मोजमाप ब्रँडने करतोच, पण यापुढे मतदान करतानाही उमेदवार वा त्याच्या पक्षाच्या ब्रँडचा विचार करूनच इव्हीएमचं बटन दाबावं लागणार असल्याचं दिसतंय. संदर्भ- सध्या राज्यभरात सुरू असलेली राजकीय ब्रँड विशेषत: ठाकरे ब्रँडवरील गरमागरम चर्चा…

तसं बघायला गेलं तर राजकारणात एखाद्या पक्षाचं वा उमेदवाराचं होणारं ब्रँडींग ही काही नवी गोष्ट नाही. ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी पासून ते 'चाय पे चर्चा' करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रत्येकानेच प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या इमेज मेकींगसाठी या तंत्राचा बेमालूमपणे वापर केलेला आहे. पूर्वी ध्यानी न येणारं हे तंत्र आता सर्वसामान्य मतदारांसाठी नवं राहिलेलं नाही. 

परंतु सध्याचा पिसाटलेला टेलिव्हिजन मीडिया, सोशल मीडियाने या ब्रँडींगला वेगळंच महत्त्व प्राप्त करून दिलंय. कवडीचंही मोल नसलेल्या मुद्द्यावर (सकारात्मक, चांगले विषय वगळून म्हणतोय मी) देशव्यापी चर्चा घडवून आणण्याचं सामर्थ्य या माध्यमांनी प्रत्येक सर्वसामान्याच्या हाती दिलंय. ओढून ताणून तयार केलेले विषय, बौद्धीक पातळी घसरलेल्या चर्चा एखाद्या प्राॅडक्टप्रमाणे सतत टाळक्यावर हॅमर करून मतप्रवाह तयार करण्याची अनोखी ताकद या माध्यमांनी एका अस्त्रासारखी उपलब्ध करून दिलीय. म्हणूनच प्रस्थापित ब्रँडनेमनाही आता या व्यासपीठावर बनणाऱ्या (बनवण्यात येणाऱ्या) मतप्रवाहांची धास्ती वाटू लागलीय. या अस्त्राच्या हल्ल्याने आपला ‘वेल नोन’ ब्रँड नेस्तनाबूत होईल की काय?, मतप्रवाहाच्या चक्रव्यूहात अडकून गटांगळ्या खाईल की काय? या चिंतेने ते ‘अन वेल’ होऊ लागलेत.  

शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याच धास्तीतून सामनातील लेखामार्फत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली. ही साद घालताना त्यांनी तोच जुना मुंबई, महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि अस्मितेचा राग आळवला. ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचं व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडं पडलं आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचं पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचं पतन व्हायला सुरुवात होईल, असं त्यांनी आपल्या लेखात लिहिलंय. 

‘ठाकरे’ हा महाराष्ट्रातल्या राजकारणातील निर्विवादपणे एक ब्रँड आहे. तसाच पवार हा ब्रँड देखील आहे. परंतु एखाद्या नटीच्या चिथावणीखोर वक्तव्याने वा विरोधक भाजपकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने या ब्रँडचं पतन होईल आणि त्यापाठोपाठ मुंबई वा मराठी माणसाचं पतन होईल, ही त्यांना वाटणारी भीती अनाठायी आहे. ते देखील तुम्ही राज्यातील आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेत असताना?

ब्रँड हा कधीच नावाने चालत नाही, तर तो कतृत्वाने चालतो, हे एखादा दूधखुळा पोरगाही सांगेल. जे अस्सल असतं ते चालतंच. सोन्याला कधीही मार्केटींगची गरज पडत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली ती माणसं जोडून, त्यामागे एक ठाम विचारधारा होती, ही विचारधारा प्रबोधनकारांच्या वारशातून आलेली असली, तरी त्यामागे एक ध्येय होतं, या समान ध्येयासाठी त्यांनी हजारो-लाखो शिवसैनिकांना प्रेरित केलं, संघटीत केलं. त्यांना आपुकीने वागवलं, मान-सन्मान दिला. त्यातूनच महाराष्ट्रात बाळासाहेबांनी स्वत:चा ब्रँड तयार केला किंबहुना तो झाला. 

शिवसैनिक त्यांचा आदेश शिरसंवाद मानत. त्यांच्यासाठी प्राण तळहातावर ठेवत. पक्षाचा एकही नगरसेवक, आमदार वा खासदार निवडून येत नसला, तरी त्यांनी कधीच चिंता केली नाही. कारण लोकप्रतिनिधींच्या बळापेक्षा शिवसैनिकांचं बळ त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं, तेच त्यांचं टाॅनिक होतं. बाळासाहेबांवरही त्यावेळी असंख्य वार झाले, पण जिथं, ज्यावेळेस उत्तर द्यायचं, तिथं त्यांनी ते बरोबर दिलं. ज्याला शिंगावर घ्यायचं त्यांनी ते घेतलं. एकदा घेतलेली भूमिका त्यांनी कधीही फिरवली नाही.

संकटात अडकलेले अनेकजण मातोश्री गाठायचे. कारण तिथं गेल्यानंतर त्यांची कामं व्हायची. सत्तापदं नसतानाही शाखा शाखांच्या माध्यमांतून लोकांच्या समस्या सोडवल्या जायच्या. शिवसेनेचा मोर्चा निघणार असं म्हणताच अनेकांचा थरकाप व्हायचा. महाराष्ट्रात त्यांनी निर्माण केलेला हा दबदबा स्थान महात्म्य नव्हे, तर व्यक्तिमहात्म्य होतं.

आजच्या घडीला मातोश्री हे नाव केवळ विरोधकांच्या टीकेतूनच ऐकायला मिळतं. सत्तेत सामील मित्रपक्षाच्या कुरबुरी ऐकून घेण्यासाठी मातोश्रीची दारे तत्परतेने किलकिली देखील होऊ शकत नाहीत, हे आजचं वास्तव आहे.

विरोधकांचं तर सोडाचं एका अभिनेत्रीच्या, पत्रकाराच्या पोकळ आव्हानानंतर तुम्ही चक्क गर्भगळीत होता? याचाच अर्थ सत्तेत असूनही तुमचा दबदबा आता राहिलेला नाही. कुणीही लेचापेचा उठून तुम्हाला आव्हान देतो अन् तुम्ही मोर्चे काढून निषेध नोंदवता, अपशब्द वापरता, तेही पक्षप्रमुखांचा आदेश नसताना?  ज्या व्यंगचित्राच्या जोरावर बाळासाहेबांनी अख्खा महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देश हलवून सोडला, तशाच व्यंगचित्राचा घाम वर्मी बसून तुम्ही चक्क घायाळ होता? इतका नाजूकपणा? कुठे ती कडव्या शिवसैनिकांची फौज आणि कुठे मुखदुर्बळ आणि आत्मसंतुष्ट नेते, जे पुढं येऊन पक्षप्रमुखाच्या समर्थनार्थ साधं तोंड देखील उघडू शकत नाही. चिखलात दगड मारून अंग बरबटल्यानंतर तुमच्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाने पुढं येऊन तुमची बाजू घ्यायची? किती हा आपमतलीबणा?

संजय राऊत यांच्या आवाहनावर कुठलीही प्रतिक्रिया न देताच राज ठाकरे यांनी जे उत्तर द्यायचं ते बरोबर दिलं. यामुळं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करण्याचा त्यांचा मनसुबा नक्कीच उधळला गेला असणार. कारण खरी गोम यातच आहे. राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यावर त्यांची देहबोली, स्टाईल, वक्तृत्व यातून आपसूकच ‘ठाकरे’ब्रँड ची झलक मिळत असली, तरी सध्या सुरू असलेल्या कोरोना संकट काळात हा ब्रँड अधिक ठळकपणे अधोरेखित झालाय. आणि हेच त्यांना नकोय, तसं झालं, तर रेडीमेड मिळालेल्या सत्ता, संघटनेचं भविष्यात अध:पतन नक्कीच आहे, याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. 

परप्रांतीयांच्या राजकीय दादागिरीविरोधात घेतलेली भूमिका असो किंवा मराठी तरूणांच्या रोजगारासाठी दिलेला लढा, यामुळे राज ठाकरे हा ब्रँड केवळ ‘ठाकरे’ नावापुरता मर्यादित न राहता स्वकर्तृत्वावर उभा देखील राहिला. 

आमदार खासदारांचं संख्याबळ पाठिशी नसताना याच ‘ठाकरे’ब्रँडने आझाद मैदानात धिंगाणा घालणाऱ्या रझा अकादमी विरोधात मोर्चा काढला होता. ती ही कुणाची भीती न बाळगता. पोलिसांची परवानगी नसताना भर रस्त्यात सभा घेऊन दाखवली होती. पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणारे करण जोहर, शाहरूख सारख्या बाॅलिवूडमधील दिग्गजांना अद्दल घडवली होती. तर टोलनाक्यावरील टोलधाडीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केलेला नसताना केवळ महाराष्ट्रात दहा-बारा सभा घेऊन मोदी सरकार, भाजपच्या नेत्यांना पळता भुई थोडी केली होती. ती स्वत:च्या धमकेवर...

आजही पक्षाचा उणापुरा एक आमदार असताना, कुठलंही सत्तापद नसताना अडचणीत सापडलेले लोकं मातोश्रीची नाही, तर कृष्णकुंजची वाट धरतात, यातच 'ठाकरे ब्रँड'ची विश्वासर्हता अधोरेखित होते.

मंदिरं सुरू करण्याची मागणी करणारे नाशिकचे पुजारी, भत्त्यात वाढ मिळावी म्हणून दाद मागणाऱ्या आरोग्यसेविका, जीम व्यावसायिक, मासेविक्रेते या काळात राज ठाकरेंची भेट घेऊन गेले. मनसेने रिक्षा चालकांच्या हप्त्यांचा प्रश्न नुकताच सोडवला, वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर अदानी कंपनीचे प्रतिनिधी नुकतेच राज ठाकरेंची भेट घेऊन गेले, याची आवश्यकता त्यांना का भासली? कोरोना संकटाच्या काळात कुठल्याही वादात न अडकता पक्षाचे कार्यकर्ते शांतपणे आपलं काम करत आहेत. भविष्यात या ब्रँडला जनसामान्यांची ताकद मिळेल की नाही, किती मिळेल, हे वेळच ठरवेल. परंतु या ब्रँडची पायाभरणी सध्या तरी आश्वासकच वाटतेय. 

‘ब्रँड ठाकरे’असला, तरी या दोन्ही ब्रँडमधील मूलभूत फरक हाच आहे. म्हणूनच विचार, संयम, स्वाभिमान यामुळे ब्रँड मजबूत होत असतो. या उलट तडजोड, लाचारी यामुळे व्यवसाय, तर होतो; पण ब्रँड रसातळाला जातो, हे मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वाक्य सध्याच्या घडीला तरी तंतोतंत लागू पडतं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा