Advertisement

महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला, शिवसेनेचा भाजपला टोला

शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून तर्कवितर्क लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला, शिवसेनेचा भाजपला टोला
SHARES

पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत, असं म्हणत शिवसेनेने भाजपला सत्तास्थापनेच्या स्वप्नातून जागं करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत पुन्हा एकदा खुलासा करण्यात आला आहे. तसंच या भेटीवरून तर्कवितर्क लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावण्यात आला आहे. (shiv sena slams bjp maharashtra president chandrakant patil for commenting on sanjay raut and devendra fadnavis meeting)

काय आहे अग्रलेखात?

राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. 

चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही. देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला. त्यामुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. 

हेही वाचा - राजकीय चर्चा तर होणारच, चंद्रकांत पाटील यांनी वाढवलं ‘त्या’ भेटीमागचं गूढ

एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या ७२ तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त देवेंद्रबाबूंनाच आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही व हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत व त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला ‘काहीतरी’ घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे? फडणवीस-राऊत भेटीत राजकारण नव्हते. 

ती एक सहज भेट होती याबाबत दोघांनी खुलासे केले. मुळात ती गुप्तभेट नव्हती. शिवसेनेत कोणीच ‘गुप्तेश्वर’ नसल्याने ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे कारण नाही. शिवसेनेचा तो स्वभाव नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे व सध्याचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही, पण चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की, ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. 

आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे. मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर ‘घडाळय़ा’चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घडय़ाळ आहे व घडय़ाळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घडय़ाळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच ‘जागते रहो’च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न.

हेही वाचा - राऊत, फडणवीस भेटीमागे ‘हे’ खरं कारण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा