Advertisement

प्रियंका चतुर्वेदी यांना लागलेल्या लाॅटरीमागची शिवसेनेची स्ट्रॅटर्जी!

शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांना दिलेली उमेदवारी ही त्यांना लागलेली लाॅटरी असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. हे खरं असलं, तरी त्यामागे शिवसेनेची निश्चित अशी स्ट्रॅटर्जी असल्याचंही दिसत आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांना लागलेल्या लाॅटरीमागची शिवसेनेची स्ट्रॅटर्जी!
SHARES

शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी नुकतीच आपल्या एकमेव उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. हे नाव ऐकून शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नेत्यांना चांगलीच मिरची झोंबली. तर काही नेत्यांच्या चेहऱ्यावर आर्श्चयाचे भाव उमटले. हे नाव होतं शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Shiv sena spokesperson priyanka chaturvedi) यांचं. शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांना दिलेली उमेदवारी ही त्यांना लागलेली लाॅटरी असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. हे खरं असलं, तरी त्यामागे शिवसेनेची निश्चित अशी स्ट्रॅटर्जी असल्याचंही दिसत आहे. 
चतुर्वेदी यांनी नुकताच राज्यसभेच्या उमेदवारीचा (shiv sena rajya sabha candidate) अर्ज भरला. इतर उमेदवार कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरत असताना चतुर्वेदी मात्र विधानभवनाच्या प्रांगणात एकट्याच आल्या होत्या. यावरून काही राजकीय नेत्यांनी त्यांची खिल्लीही उडवली. परंतु अर्ज भरताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब विखे, पृथ्वीराज चव्हाण इ. नेते आवर्जून उपस्थित होते. यावरून त्यांचं पक्षातील राजकीय वजनही लक्षात येतं.


ज्येष्ठ नेत्यांचा तिळपापड

खरंतर काँग्रेसला (congress) सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना पक्षात पाऊल ठेवून उणंपुरं वर्षही झालेलं नाही. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे लोकसभेआधी एप्रिल २०१९ मध्ये त्या शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संपर्कामधून त्या शिवसेनेत आल्या होत्या. त्यामुळे आदित्य यांनी चतुर्वेदी यांच्यासाठी किल्ला लढवल्याचं म्हटलं जात आहे. पण त्यांना थेट राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांचा तिळपापड झाला आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिवाकर रावते इच्छूक होते. मात्र या दिग्गज नेत्यांना डावलून शिवसेनेने प्रियंका यांना झुकतं माप दिलं. यामुळे नाराज झालेले चंद्रकांत खैरे यांनी, मला नाही, पण माझ्या शहराला खासदारकीची गरज होती. प्रियंका चतुर्वेदींना चांगलं हिंदी आणि इंग्रजी बोलता येतं. शिवसेना नेतृत्वाला आमचं काम दिसलं नाही, पण त्यांचं दिसलं. मी बाळासाहेबांसोबत काम केलं आहे, आता उद्धव ठाकरेंसोबत काम करत आहे. त्यांना आणि आदित्य ठाकरेंना नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असं वाटत आहे. मला इतर पक्षांकडून अनेक आॅफर्स आल्या, तरी मी स्मशानात जाईपर्यंत शिवसेनेतच राहिन. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर यांना आणलं हाेतं, पण त्यातून काय साधलं? अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. यावरून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना चतुर्वेदी यांना देण्यात आलेली उमेदवारी फारशी रुचलेली नाही, असंच दिसत आहे. पण पक्षनेतृत्वाने या नाराजीकडे फारसं लक्ष द्यायचं नाही असंच ठरवलेलं दिसत आहे.

शिवसेनेचा अमराठी चेहरा 

मूळच्या उत्तर प्रदेशातील पण मुंबईतच लहानच्या मोठ्या झालेल्या चतुर्वेदी यांच्याकडे शिवसेनेचा अमराठी चेहरा म्हणून पाहिलं जातं. चतुर्वेदी या हुशार राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. शिवाय सोशल मीडियावरील प्रसिद्ध ब्लाॅगर (social media blogger) अशीही त्यांची ओळख आहे. त्याआधी तेहलका, डीएनए, फर्स्टपोस्ट अशा वृत्तपत्रांमध्येही त्यांनी स्तंभ लेखन केलं आहे. देशातील टाॅप टेन ब्लागरमध्ये त्यांची गणना केली जाते. सध्या राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्या मत मांडताना दिसतात.

मीडिया मॅनेजमेंटमध्ये हातखंडा 

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्यासाठीही त्यांनी प्रचार केला होता. काँग्रेसमध्ये असताना प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (randeep surjewala) यांच्या नेतृत्वाखाली मीडिया सेलमध्ये (congress media cell) काम केलं आहे. सुरजेवाला यांच्यासोबत अनेकदा त्यांनी पत्रकार परिषदा देखील घेतल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा त्यांना १० वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाची सध्या शिवसेनेला गरज आहे. चंद्रकांत खैरेंनी मारलेला टोमणाच शिवसेनेसाठी फायद्याचा ठरु शकतो. शिवसेनेचे कट्टर मराठी नेते राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडताना चाचरत असताना उत्तमरित्या हिंदी आणि इंग्रजी बोलणाऱ्या चतुर्वेदी शिवसेनेची भूमिका दिल्लीत प्रभावीपणे मांडू शकतील, असं पक्षनेतृत्वाला वाटत आहे. मीडिया मॅनेजमेंट हा त्यांचा हातखंडा असल्याने शिवसेनेची प्रतिमा सुधारण्यात मदत होऊ शकते. दिल्लीत लाॅबिंग करण्यात शिवसेनेला त्यांची मदत होऊ शकते.

राऊतांवर वचक 

शिवाय काँग्रेसमध्ये १० वर्षे काम केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. काँग्रेसचे राजकीय पातळीवरचे सर्व निर्णय हे दिल्लीतील पक्षनेतृत्वाकडूनच घेतले जातात. त्यातच महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (maha vikas aghadi) काँग्रेससोबत जुळवून घेताना चतुर्वेदी यांची पक्षाला मदत होऊ शकते, असंही पक्षाला वाटत आहे. सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात शिवसेनेचा चेहरा म्हणून संजय राऊत याची ओळख आहे. परंतु काही प्रसंगी संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी बेताल वक्तव्य करून पक्षाला अडचणीतही आणलेलं आहे. अशा वेळी चतुर्वेदी यांना दिल्लीत पाठवून राऊत यांच्यावर वचक निर्माण करता येईल, असंही पक्षाला वाटत असल्याचं म्हटलं जात आहे.

एकूणच काय तर होतकरू आणि राजकारणात आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चतुर्वेदी यांना शिवसेनेनी दिलेली संधी पक्षासाठीही फायद्याची ठरू शकते. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा