Advertisement

मराठा मोर्चा नेतृत्वहीन - विनायक मेटे


मराठा मोर्चा नेतृत्वहीन - विनायक मेटे
SHARES

'मराठा मोर्चा' नेतृत्वहीन झाला आहे. वेगवेगळ्या संघटना मोर्चे काढत आहेत. सर्वत्र सावळा गोंधळ निर्माण झाल्याने कुठल्या मोर्चाला जावे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र यावे, असे विधान शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी चर्चगेट येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. सोमवारी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषदेत प्रवेश केला. त्यावेळी मेटे बोलत होते.

यावेळी सुबोध मोहिते म्हणाले की, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मला काम करायला संधी मिळाली नाही. मी 'नॉन परफॉर्मिंग अॅसेट' झालो होतो. हायकमांडने मला काम करण्याची संधीच दिली नाही. म्हणून मी शिवसंग्राममध्ये काम करण्यासाठी आलो आहे.

काँग्रेस हा दिशाहीन पक्ष झाला आहे. सर्जिकल स्ट्राईकबाबत काँग्रेसने लष्करावर संशय घेतला. यावरून काँग्रेस पक्ष कोणत्या दिशेने चालला आहे, हे दिसून येते. राज्याचे दुर्देव आहे की असा विरोधक आपल्याला लाभला अाहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादावर मत मांडताना मेटे म्हणाले की, महाराष्ट्रात राहूनच काही लोक महाराष्ट्रद्रोहाची भूमिका घेतात. बाळासाहेबांचे राज्यासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे याचिका करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींनी त्यांच्या कार्याची माहिती घेऊन याचिका करावी. कितीही पैसे लागले तरी त्यांचे स्मारक झालेच पाहिजे. त्यामुळे न्यायालयालाही माझी विनंती आहे की, त्यांनी अशा लोकांच्या याचिकांचा अभ्यास करूनच त्यावर सुनावणी घ्यावी.

दरम्यान, रिलायन्स, शापुर्जी पालनजी, एल अँड टी या कंपन्यांनी स्मारकाच्या प्राथमिक टप्प्यासाठी निविदा भरल्या होत्या. त्यात तांत्रिक दृष्ट्या रिलायन्स टिकू शकले नाही. शपुर्जी पालनजी व एल अँड टी या कंपन्या त्यासाठी पात्र ठरल्या. त्यातील स्मारकाच्या मूळ पहिल्या टप्प्याचे बिलात मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे सल्लागार समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले असल्याचे मेटे यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यानंतर स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

भारतीय संग्राम परिषद पक्ष राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी सुबोध मोहिते यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहितीही मेटे यांनी दिली.

सध्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत वेगवेगळे दिसत आहेत, हाच 'आत्मक्लेश' आहे का? असा सवालही मेटे यांनी केला.संघटनेची ताकद मोठी असते, हे दोघांनी लक्षात घ्यावे. दोघांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडाव्यात. तसेच मंत्रिपद न दिल्याने माझी नाराजी स्वभाविक असल्याचेही मेटे म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा