Advertisement

महापालिका सभागृह नेत्यांची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण


महापालिका सभागृह नेत्यांची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण
SHARES

मुंबई महापालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांच्याविरोधात शिवसेनेचे महापालिकेतील नेते आणि नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची पाठराखण केली. महापालिकेतील प्रत्येक विषयांबाबत यशवंत मला सांगूनच निर्णय घेत असतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना नगरसेवकांना गुण्या गोविंदाने काम करण्याच्या सूचना केल्या.

मुंबई महापालिकेच्या सभागृहनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड झाल्यानंतर ते सतत वादात अडकत आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी निर्णय बदलले जात असल्यामुळे तसेच सर्वच समित्यांच्या बैठकींमध्ये पक्षाची भूमिका सदस्यांना न सांगणे यावरून यशवंत जाधव यांचे व्यक्तीमत्व वादग्रस्त ठरले आहे. नगरसेवकांना टोलमाफी देण्यात यावी,या ठरावाच्या सुचनेवरून महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना उद्धव ठाकरे यांनी चांगलेच झापले होते. यासर्व पार्श्वभूमीवर तब्बल 3 महिन्यांनी उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांच्या महापलिकेतील कामाचा आढावा घेतला. या बैठकींमध्ये महापालिकेतील शिवसेना नेत्यांचा समाचार घेतला जाणार असल्याची चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनी सभागृहनेते यशवंत जाधव यांची पाठराखणच केली आहे. यशवंत जाधव यांनी सर्व नगरसेवकांना आपण पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे महापालिकेत निर्णय घेत असल्याचे सांगितले. याचाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी यशवंत, कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला माहिती देत असतो. आपली परवानगी घेत असतो, असे सांगितले. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना चिडीचूप करत यापुढे रुसवा फुगवा न बाळगता यशवंत जाधव यांना सांगूनच काम करावे. सर्वांनी गोडी गुलाबीने, गुण्यागोविंदाने काम करावे,अशाच सूचना तब्बल दोन तास सुरू असलेल्या बैठकीत केल्याचे सूत्रांकडून समजते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नगरसेवकांची बैठक होती. या पावसाळ्या कुठेही पाणी तुंबणार नाही, तसेच कुठेही रस्त्यावर खड्डे पडणार नाही याची काळजी सर्वच नगरसेवकांनी घ्यावी. लोकांना आपल्याकडे बोट दाखवायची संधी देऊ नका तर लोकांना आपलेसे वाटावे, असे काम करा,अशाच सूचना पक्षप्रमुखांनी केल्याचे समजते. साचलेला कचरा आणि साथीच्या आजारांवरही नगरसेवकांचे विशेष लक्ष असायला हवे. या पावसाळ्यात शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाने सतर्क राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पावसाळ्यातील समस्या व्यतिरिक्त विकास आराखडा आणि महापालिकेच्या विविध प्रश्नाबाबतही त्यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. शिवसेनेतील महापालिकेचे नेते आणि माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्यानंतर मग त्यांनी सर्वांशी चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते लिलाधर डाके हेच यावेळी उपस्थित होते, असे सूत्रांकडून समजते.

मुंबईकरांच्या गरजा लक्षात घेता खेळाची मैदाने, उद्याने, रुग्णालये,शाळा यांच्या आरक्षणाला विकास आराखड्यात धक्का लावू नका,अशी सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना केल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. तसेच पावसाळ्यात प्रभागांमध्ये करावयाची कामे, दक्षता तसेच मुंबई विकास आराखड्याबाबत त्यांनी नगरसेवकांना काही सूचना केल्याचेही महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा