Advertisement

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का

विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांचा हात धरला आणि त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊ लागले. तेवढय़ात भास्कर जाधव यांनी राऊत यांचा हात झटकला

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच कोकण दौर्‍यावर आहेत. अशातही त्यांच्या दौर्‍याइतकीच चर्चा आहे ती भास्कर जाधव यांच्या 'नाराजी'नाम्याची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गणपतीपुळे येथे बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येत होता. त्यावेळी व्यासपीठावर कोपर्‍यातली खुर्ची मिळाल्याने भास्कर जाधव वैतागले. त्यांची नाराजी विनायक राऊत यांच्या लक्षात आली. त्यानंतर विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांचा हात धरला आणि त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊ लागले. तेवढय़ात भास्कर जाधव यांनी राऊत यांचा हात झटकला. प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी हे चित्र आणि भास्कर जाधव यांची नाराजी टीपली. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले भास्कर जाधव हे अजूनही नाराज आहेत हे त्यांच्या आजच्या कृतीतून स्पष्ट दिसले.याआधी जिल्हा आढावा बैठकीतही भास्कर जाधव यांची नाराजी चर्चेत आली होती. पालकमंत्री म्हणून अनिल परब जेव्हा र%ागिरीत आले होते. त्यावेळी भास्कर जाधवही हजर होते. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे त्यांनी त्यावेळीही टाळले होते. भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेनेत आले होते. मात्र जेव्हा मंत्रिमंडळाचे वाटप झाले तेव्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटले होते. मात्र ते न मिळाल्याने भास्कर जाधव कमालीचे नाराज झाले होते. ती नाराजी अद्यापही कायम आहे हे व्यासपीठावरची दृश्यच सांगून गेली. 


उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशी खंत भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सत्काराच्या वेळी शिवसेना खासदार विनायक राऊत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री अनिल परब, आमदार राजन साळवी हे सगळे उपस्थित होते. मंचावर कोपर्‍यातली खुर्ची दिल्याने भास्कर जाधव नाराज झाले होते. त्यांची नाराजी लक्षात येताच विनायक राऊत त्यांच्याजवळ गेले त्यांचा हात हातात घेऊन त्यांना उद्धव ठाकरेंच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र राऊत यांचा हात भास्कर जाधव यांनी झटकला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा