महापौर, उपमहापौर निवडणुकीत 'सपा' स्वतंत्र राहणार

  Mumbai
  महापौर, उपमहापौर निवडणुकीत 'सपा' स्वतंत्र राहणार
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला विचारात न घेतल्यामुळे समाजवादी पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र राहणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

  निवडणुकीत काँग्रेस, सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली. परंतु निवडणूक निकालानंतर महापौर पदासाठी तिन्ही पक्षांची युती होईल, असे संकेत काँग्रेसने दिले होते. परंतु शनिवारी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने विठ्ठल लोकरे आणि उपमहापौर पदासाठी विनी डिसूझा यांचे अर्ज भरले. पण हे अर्ज भरताना समाजवादी पक्षाला विचारात घेतले नाही किंबहुना कल्पनाही दिली नाही. त्यामुळे या निवडणुकीत सपा स्वतंत्र राहील, असे रईस शेख यांनी सांगितले.

  काँग्रेसवर आमचा विश्वास नसून, ते शेवटच्या क्षणाला शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही भीती रईस शेख यांनी व्यक्त केली. जर काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नसेल तर त्यांनी खुलासा करावा. त्यानंतर आम्ही काँग्रेसला पाठिंबा द्यायचा की नाही याचा विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय 'सपा'ने राखून ठेवला असल्याचेही शेख यांनी म्हटले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.