परीक्षेच्या वेळापत्रकासोबतच हवी निकालाची तारीख

 Mumbai
परीक्षेच्या वेळापत्रकासोबतच हवी निकालाची तारीख

विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्या, की या परीक्षांचा निकाल कधी लागणार याविषयीच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरू लागतात. दरवर्षी एक ना अनेक खोट्या तारखा अफवेच्या रुपात पसरत असल्याने विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. एवढेच नव्हे, तर नंतर निकाल कधी लागणार यासंबंधी बोर्डालाही खुलासा करावा लागतो. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करतानाच निकालाचीही तारीख जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरवर्षी दहावी, बारावीच्या निकालाच्या खोट्या तारखा मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालक गोंधळून जातात. हा गोंधळ दूर करण्यासाठी या परीक्षांच्या वेळापत्रकाबरोबरच निकालाची तारीख जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मंडळाकडे केली आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लगेच तपासण्यासाठी पाठवल्या जातात. पेपर तपासणीसाठी शिक्षकांना दहा दिवसांचा अवधी दिला जातो. नियामक आणि मुख्य नियामकाकडे पेपर सुपूर्द करुन त्यांचे काम 10 ते 15 दिवसांत पूर्ण होते. त्यांनतर गुण भरण्याचे काम असते. बोर्डाने निश्चित केलेल्या अवधीतच काम पूर्ण केले जाते. त्यामुळे निकालाच्या तारखा आधीच घोषित करणे बोर्डाला अवघड नाही.


- अनिल बोरनारे, शिक्षक परिषद, मुंबई विभाग

Loading Comments