यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क (Shivaji Park)वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शिवसेनेला (Shiv sena) दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेची पक्ष म्हणून परवानगी मागत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली.
2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) शिवसेनेच्या मागणीला हस्तक्षेप कणारी शिंदे गटाची याचिका हाय कोर्टाने फेटाळली आहे. आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयात शिवाजी पार्कवरील शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या मुद्यावर जोरदार युक्तिवाद झाला. या सुनावणीत शिवसेनेने मैदानाच्या मागणीसाठी शिवसेनेने प्रथम याचिका दाखल केल्याचा दावा करत शिंदे गटाची याचिका धूडकावून लावण्याची मागणी केली. त्यावर कोर्टाने या प्रकरणी पहिला अर्ज कुणी केला? अशी विचारणा केली.
मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांना मैदान मिळवण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. मुंबई महापालिकेकडून मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी जुन्या निकालांचा दाखला दिला. दोन्ही गटांना मैदान मिळवण्याचा अधिकार नाही. हीच जागा हवी असा अधिकार कुणालाही गाजवता येणार नाही. दसरा मेळावा ही परंपरा, पण अधिकार असू शकत नाही.
शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही आहे. याप्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गेली 28 वर्षे ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, त्याच पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान नाकारले होते.
दसरा मेळाव्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय पोलिसांनी दिल्याचे कारण पुढे करत पालिकेच्या जी - उत्तर विभागाने दोन्ही गटांना तसे पत्र पाठवून कळवले होते.
गेल्या 56 वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. कोविड संकटामुळे मागील दोन वर्षे शिवसेनेने बंदिस्त जागेत मेळावा घेतला होता. कोविड निर्बंध हटवल्याने यंदा शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे नियाेजन आहे.
पण, जर न्यायालयीन लढाईत शिवाजी पार्क मैदान मिळाले नाही. शिवसेनेकडून 'प्लॅन बी' तयार ठेवण्यात येत आहेत. दादरमधील शिवसेना भवनसमोर मेळावा घेण्याचा पर्याय सेनेतून चाचपून पाहिला जात आहे. शिवसेना भवनाच्या गॅलरीतून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करू शकतात, असे सेनेतील सूत्रांनी सांगितले. मात्र, शिवाजी पार्कात घुसून मेळावा घेण्याचा सेना नेतृत्वाचा मानस नसल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा