काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देणाऱ्या काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा मागे घ्यावा तसंच कुठल्याही वादात न पडता संयम बाळगून पक्षाचं काम करावं, असा सल्ला काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडून उर्मिलाला देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला ऐकूण उर्मिला राजीनामा मागे घेणार का? यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राजधानी दिल्लीत काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मुंबई काँग्रेस अध्यक्षांसह काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासोबत काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्यावरही चिंता व्यक्त करण्यात आली. यांत प्रामुख्याने उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या राजीनाम्यावर पुन्हा एकदा विचार करावा, अशी विनंती काँग्रेसकडून करण्यात आल्याचं समजत आहे.
यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, उर्मिला मातोंडकर यांच्या पुरोगामी विचारांची बैठक पक्की आहे. निवडणुकीचं राजकारण आणि वैचारीक गोष्टींमध्ये कधीकधी फरक पडतो. त्यांच्या विचारांचा काँग्रेसने उपयोग करून घेतला पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये राहण्याची विनंती करण्यात आली असून पुरोगामी विचारांसाठी काम करत राहील, असं आश्वासन त्यांनी दिलं.
तर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी सांगितलं की, उर्मिलाने राजीनामा देणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अनेकदा विनंती केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर मी स्वत: त्यांची भेट घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला टक्कर दिल्याबद्दल अभिनंदन केलं होतं. तुमची वैचारिक प्रतिबद्धता कमालिची असून तुमचे चाहते देखील असंख्य आहे. तुमच्या वयाकडे पाहता तुम्हाला काँग्रेसमध्ये चांगलं भविष्य आहे. केवळ तुम्ही अंतर्गत राजकारणापासून दूर राहा आणि संयम बाळगून काम करत राहा, असा सल्लाही दिल्याचं निरूपम म्हणाले.
तसंच उर्मिलाने लिहिलेलं पत्र सार्वजनिक झाल्यामुळे त्या नाराज होणं स्वाभाविकच होतं. परंतु केवळ यामुळे पक्ष सोडणं योग्य ठरत नाही. कारण अंतर्गत राजकारण काँग्रेस नाही, तर सर्वच पक्षात आहे. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा मागे घेऊन पक्षासाठी काम करावं, अशी त्यांना विनंती केल्याची माहितीही निरूपम यांनी दिली.
सोबतच, उर्मिला यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या पाठिशी असल्याचंही तांबे यांनी जाहीर केलं आहे.
हेही वाचा-
काँग्रेसमधील राजीनाम्याचे पडसाद, मुंबई अध्यक्ष दिल्लीला रवाना
उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी