Advertisement

काँग्रेसमधील राजीनाम्याचे पडसाद, मुंबई अध्यक्ष दिल्लीला रवाना


काँग्रेसमधील राजीनाम्याचे पडसाद, मुंबई अध्यक्ष दिल्लीला रवाना
SHARES

लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेलं काँग्रेसमधील गळतीसत्र अजूनही थांबलेलं नाही. अवघ्या ६ महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी एकापाठोपाठ राजीनामे दिल्याने मुंबई काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. या राजीनाम्याचे पडसाद दिल्लीतही उमटले असून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तडक मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना दिल्लीला बोलवून घेतलं आहे.

उर्मिला मातोंडकर हिने लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ सेवा करायची असल्याचं म्हणत प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मुंबईतील दिग्गज नेते उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार नसताना ऊर्मिलाने या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी उर्मिलाचा ४,६४,०२८ मतांनी पराभव केला होता.

या पराभवानंतर संजय निरूपम समर्थकांनी प्रचाराचं काम व्यवस्थित न केल्याचा आरोप करत या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उर्मिलाने केली होती. परंतु या मागणीकडे तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दुर्लक्ष केलं. तसंच उर्मिलाने देवरा यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झाल्यानेही ती नाराज होती. 

काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना 'मुंबई काँग्रेसमध्ये मला व्यापक उद्दिष्टांसाठी काम करायचं होतं. मात्र, महत्त्वाची पदं सांभाळणाऱ्या नेत्यांनाच पक्षबांधणीत रस उरलेला नाही किंवा त्यांची तशी क्षमता नाही. यापुढं पक्षांतर्गत राजकारणासाठी मला स्वत:चा वापर होऊ द्यायचा नाही. पक्षातंर्गत राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं.'  

उर्मिलाच्या राजीनाम्यानंतर मिलिंद देवरा आणि संजय निरूपम या मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी ट्विटरवरून एकमेकांवर नाव न घेता टीका केली होती. 

त्या पाठोपाठ काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेशी असहमत असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी आपला राजीनामा दिला. काँग्रेसच्या छाननी समितीत तसंच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची कर्नाटक भवनमध्ये भेट घेऊन त्यांच्यापुढंही सिंह यांनी नाराजी व्यक्त केली होती.  

या राजीनाम्यामुळे मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत दुफळी चव्हाट्यावर आल्याने काँग्रेस हायकमांडने गायकवाड यांना बुधवारी दिल्लीला बोलावून घेतलं आहे. सोनिया गांधी गायकवाड यांच्यासोबत मुंबई काँग्रेसमधील गटबाजीवर चर्चा करण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

उर्मिलाच्या राजीनाम्यामागे ‘हे’ कारण?

कृपाशंकर सिंह यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, भाजपात प्रवेश करण्याची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा